Breaking News

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेती व फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनास निर्देश


लॉकडाऊन काळात संसर्ग रोखणे व आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर; नागरिकांनी सहकार्य करावे - ना. मुंडेंचे रुग्णालयातून जिल्हा वासीयांना आवाहन

मुंबई  : बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेती व फळ पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देऊन त्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन...

दरम्यान आज बीड जिल्ह्यामध्ये २६ मार्च ते ४ एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी या दहा दिवसांच्या काळात कोरोना संसर्ग रोखणे व आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली असून, ते सध्या मुंबई येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती आकडेवारी लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी थेट रुग्णालयातून बीड जिल्हावासीयांना लॉकडाऊन काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
No comments