Breaking News

आत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यास मिळाला न्याय.... तहसीलदारांनी दिला शेत रस्ता देण्याचा आदेश

गौतम बचुटे । केज 

ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ऊस   तोड रखडल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर उसाच्या फडातच सामूहिक आत्मदहनाचा ईशारा दिला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरून तहसीलदारांनी तातडीने दखल घेऊन या शेतकऱ्यांना रस्ता देण्या बाबत आदेश काढला.

केज तालुक्यातील शेतकरी महादेव ईखे, अनंत कणसे, मारुती कणसे, रामेश्वर गुळवे, शिवाजी ईखे, पांडुरंग ईटकर, चांगदेव यादव यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले असून म्हटले आहे की, सोनेसांगवीच्या शिवारातील गट नं सर्व्हे नं. १५, २१, २२ आणि २५ मध्ये ऊस लागवड केली आहे या उसाला जवळ जवळ एक वर्षा पेक्षा जास्त मुदत झाली असून १३-१४ महिने लोटले. मात्र शेजारील काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घ्यावा. अन्यथा चार दिवसात जर रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर शेतातील उसाच्या फडात सामुदायिक आत्मदहन करण्याचा ईशारा या शेतकऱ्यांनी दिला होता आणि ते सात तरुण शेतकरी बेपत्ता झाले होते. 

त्या नंतर तहसीदार दुलाजी मेंढके यांनी तातडीने या प्रकरणी दखल घेतली. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे समवेत समक्ष पाहणी केली. ऊस वाहतुक करण्यास रस्ता उपलब्ध नसल्याचे  निदर्शनास आले. सदर शेतकरी यांचा ऊस कारखान्याला पाठविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२९ अनव्ये सार्वजनिक शांतता अबाधित रहावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आदेश पारीत केला. 

या आदेशात अर्जदार यांना मौजे सोनेसांगवी ते सुर्डी शिवारापर्यंत ऊसाची वाहतुक करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात स.नं .२२ मध्ये कच्चा भराव टाकलेल्या रस्त्यावरुन पुढे स.नं .२५ अ , २५ अ चे पोट हिस्सा मधुन, स.नं. २५ मधील बब्रूवान कणसे यांचे बांधा वरुन तसेच स.नं.२४, स.नं.२३ चे नंबर बांधावरुन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येत असून अर्जदार व गैरअर्जदार यांनी ऊसाची वाहतुक करताना सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी. असा आदेश दिला आहे. यामुळे अनेक दिवसां पासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मिटला असून यामुळे सदर निर्णयाचे व तहसीलदार मेंढके यांचे कौतुक होत आहे.

No comments