Breaking News

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात : आमदार विनायकराव मेटे यांची विधान परिषदेमध्ये मागणी

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क व ड श्रेणी दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाला आहे. एकाच बेंचवर दोन विद्यार्थी, प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच, काळ्या यादीतील कंपनीकडे भरतीची सूत्रे असल्याची धक्कादायक बाबही प्रकाशात आली. या पार्श्वभूमीवर आमदार विनायकराव मेटे यांनी  विधान परिषदेत आज सुचना दाखल करून परिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीसाठी  रविवारी घेतलेल्या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ व नियोजनाचा अभाव होता. काही ठिकाणी अर्धा तास उशीरा परिक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्राचे वाटपही योग्य पद्धतीने केले गेले नाही. तर  एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसविले गेले. विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकेचे सील उघडण्याचा नियम आहे. मात्र, या परिक्षेत आधीच प्रश्नपत्रिकेचे सील उघडण्यात आले होते. या प्रकारावर आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. संबंधित परिक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, चक्क काळ्या यादीत असलेल्या एका कंपनीला भरती प्रक्रियेचे काम सोपविण्यात आले, याकडे आमदार विनायकराव मेटे  यांनी दाखल केलेल्या सुचनेद्वारे लक्ष वेधण्यात आले. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरलेल्या उमेदवारांना केवळ एकाच पदासाठी परिक्षा देता आली. त्यामुळे दोन वर्षांपासून अभ्यास व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असा मुद्दाही आमदार मेटे यांनी मांडला आहे. 

महाविकास आघाडी सरकारकडून घाईघाईत होणाऱ्या भरतीप्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे, असे आमदार विनायकराव मेटे यांनी नमूद केले. तसेच संबंधित परिक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी केली या विषयावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे म्हणाले " आरोग्य भरती मधे जर घोटाळा झाला असेल, ज्या ज्या परीक्षा सेंटर वर अपहार झाला असेल, त्या सर्व सेंटर ची तपासणी करण्यात येईल व राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या विषयाची सखोल चौकशी राज्य सरकार करणार. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व गरज पडली तर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल असे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

No comments