Breaking News

जिल्हाधिकारी साहेब, नागरी सुविधा न पुरविणाऱ्या बीड नगर परिषद ला कोण दंड करणार ? - सय्यद इलयास

बीड : शहरात 24 तास उडणारा धुराडा, गल्लीबोळात बरबटलेला कचरा, मुख्य रस्त्यांसह  गल्लीबोळात तुंबलेल्या नाल्या, शहरातून जाणाऱ्या महामार्गासह शहरातील इतर खड्डेयुक्त रस्ते, नाल्या वेळोवेळी वेळेवर काढले जात नसल्याने निर्माण झालेला मच्छरांचा सुळसुळाट यासाठी दोषी असलेल्या बीड नगर परिषदेला कोण दंड करणार ? असा जळजळीत प्रश्न एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकातून उपस्थित करत  नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना च्या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार दररोज बारा तासांचा लॉक डाऊन लावण्यात आला यामुळे पोलीस विभागासह बीड नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी ही रस्त्यावर उतरून चुकून विना मास्क असलेल्या नागरिकांना अडवून 200 ते 500 रुपये पर्यंतचा दंड आकारून दंडित करीत आहेत. नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची व जीवाची काळजी तर असतेच शिवाय त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबीयांची सुद्धा असते. कुणीही जाणून बुजून जोखीम घेत नाहीत. गडबडीमध्ये घरी राहिलेले किंवा कुठेतरी विसरलेले मास्क विना नागरिक दिसले की त्यांना दंडित करण्याचे व दंडे मारण्याचे कार्य दोन्ही विभागाकडून शहरात सुरू आहे. 

याचा कुठे तरी विचार व्हायला हवा. जर नागरिकांनी फक्त मास्क घातला नाही म्हणून दंडुक्यांसह आर्थिक दंड ठोठावला जात आहे. जर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपल्यासह  मुख्याधिकारी व बीड नगरपरिषद सर्वसामान्यांवर शासन करत दंड वसूल करीत असेल तर मग धुराडा, बरबटलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या, खड्डेयुक्त रस्ते, मच्छरांचा सुळसुळाट यासाठी दोषी असलेल्या बीड नगर परिषद ला कोण दंड करणार ? असा प्रश्न करून वर उल्लेख केलेल्या सर्व आवश्यक गोष्टीची पूर्तता करत नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणीही एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे.
No comments