Breaking News

मेहनत, प्रयत्न, जिद्दी जोरावर केज तालुक्यातील साळेगावचा डॉ. प्रसन्ना अबुधाबीत शास्त्रज्ञ

 


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगावचा एक तरुण आता आपल्या देशाच्या सिमा ओलांडून तो संयुक्त अरब अमिरातीत ऑटोनॉमस रिसर्च विभागात  वरीष्ठ संशोधक म्हणून नियुक्ती झाली असल्याने जिल्ह्याचा नव्हे तर डॉ प्रसन्ना राऊत यांच्या रूपाने तो देशाचा बहुमान आहे. 

साळेगाव ता. केज येथील रहिवाशी  सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानोबा राऊत यांचे चिरंजीव, डॉ. प्रसन्ना राऊत यांची संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सरकारच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर येथे डिपार्टमेंट ऑफ आटोनॉमस रोबोटिक्स विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ पदी निवड झाली आहे.

डॉ. प्रसन्ना यांचं प्राथमिक शिक्षण केजच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वकिलवाडी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हे केजच्याच स्वामी विवेकानंद विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण हे लातूरच्या सुप्रसिद्ध राजर्षी शाहू विद्यालयात आपल्यातील हुशारीची चुणूक दाखवत पूर्ण केले. त्या नंतर नांदेडच्या श्री गुरूगोविंद सिंह (SGGS) इंजिनिअरिंग कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन या विषयात सर्वोत्कृष्ट टक्केवारी मिळवत B.Tech ची पदवी प्राप्त केली. आपल्यातील उत्कृष्ट बुद्धिमत्तेच्या बळावर पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजेच M.Tech करिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन & टेक्नॉलॉजी, ग्वालीयर (IIIT Gwalior) येथे प्रवेश मिळवून या ठिकाणी सुद्धा उत्कृष्ट गुण मिळवत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परंतु काहीतरी विशेष करण्याची जिद्द मनात असल्याने डॉ. प्रसन्ना येथेच थांबले नाहीत; तर पुढे याच विषयात डॉक्टरेट मिळवण्यासाठी नागपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT- Nagpur) येथे प्रवेश मिळवला.

आपल्यात असलेली कल्पक बुद्धीमत्ता, विषयाच्या खोलात जाऊन अभ्यासण्याची सचोटी, प्रचंड मेहनत, ध्येयाप्रती असणारी निष्ठा, कुटुंबीय व आप्तस्वकीयांचा मानसिक आधार, या सर्व बाबींची योग्य सांगड घालून ३ वर्षांचा हा खडतर प्रवास पूर्ण करत वायरलेस कम्युनिकेशन या विषयावर शोध प्रबंध सादर करून वयाच्या २८ व्या वर्षी टेक्नॉलॉजी विषयात डॉक्टरेट मिळवणारा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिला विद्यार्थी असा सर्वोत्कृष्ट बहुमान मिळवला.

या विशेष प्राप्त शिक्षणाच्या जोरावर मागच्या वर्षी मार्च-२०२० मध्ये तैवान देशातील संशोधन कंपनी मध्ये संशोधक  तथा शास्त्रज्ञ म्हणून त्यांना पहिली नौकरी मिळवली. नौकरीसाठी तैवानला प्रस्थान करणार इतक्यात संपूर्ण जगावर कोरोना विषाणू ने विळखा घातला आणि मग घरी थांबनुनच ऑनलाइन पद्धतीने काम करावे लागले. घरी असल्याने कामाचा वेळ संपवून थोडा फावला वेळ मिळत होता. आणि याच वेळेचा सदुपयोग करत आपला अभ्यास सुरूच ठेवला; आणि जीवतोडुन, मनमारून केलेल्या या अभ्यासाला यश ही तितकंच दैदिप्यमान आलं. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील 4G 5G सारखे सॉफ्टवेअर तयार करून, मोबाईल नेटवर्क कंपन्यांना ते प्रोव्हाइड करणाऱ्या बंगलोर येथील मॅवनिर या नामांकित कंपनीत रिसर्च & डेव्हलपमेंट विभागात शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. आनंद तर गगनात मावत नव्हता. कामासाठी मिळणारं मानधन ही अवाजवी होतं. सगळं काही सुरळीत चालू होतं. परंतु स्वतः मधील आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी शांत बसू देत नव्हती. बाहेर देशातील अनेक नामांकित कंपन्यामध्ये मुलाखती देणे सुरूच होते. 

आजवर घेतलेल्या शिक्षणाची, केलेल्या कामाची, त्यावरून घेतलेल्या अनुभवाची, आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याची योग्य सांगड बसत नव्हती. आणि मग यातच २ मार्च २०२१ रोजी [Advance Technology Research Council (U.A.E. Government)] तंत्रज्ञान संशोधन परिषद, अबुधाबी - यु.ए.ई. सरकार :  या ठिकाणी विशेष असे १ कोटी १० लाख रु. प्रतिवर्ष मानधन देऊ करून वरिष्ठ शास्त्रज्ञ पदी निवड झाली आहे. कोरोना चाचणी, लसीकरण आणि अन्य सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता करून लवकरच डॉ.प्रसन्ना हे पदभार स्वीकारण्यासाठी अबुधाबी ला प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या या यशा बद्दल डॉ. प्रसन्ना राऊत यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंताकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

No comments