Breaking News

रोहिणी आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा -प्रकाश कानगांवकर


बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधनांना निवेदन

बीड :  न्यायमुर्ती पी.जी. रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, उपेक्षितांना आरक्षणाचा लाभ मिळावा, ज्या ओबीसींना लाभच मिळत नाही त्यांना आयोगाने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून रोहिणी आयोगाची अंमलबजावणी व्हावी व ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर यांनी केली आहे.

 

बारा बलुतेदार महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार, भटक्या जाती, एस.बी.सी. जमातींना अग्रक्रमाने न्याय मिळाला पाहिजे व शेवटच्या 10 टक्क्यांमध्ये सामील केले पाहिजे. न्यायमुर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करुन प्रशिक्षण, ट्रेनिंग सेंटर उभारावे व उद्योगांना केंद्रीय मदत मिळावी तसेच तयार मालाची हमी देण्यात यावी.

 लॉकडाऊन काळात आत्महत्यग्रस्त कुटूंबांना 10 लाख रुपये भरपाई द्यावी, बारा बलुतेदार कारागिरांना दरमहा 10 हजार रूपये देण्यात यावेत, कारागिरांना आधुनिक यंत्र साहित्य शासकीय निधीतून देण्यात यावेत, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन रुपये 100 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, ओबीसी महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून या निवेदनाच्या प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून या मागण्यांचा केंद्र सरकारने व राज्य सरकारने गांभिर्याने विचार करुन त्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, रमेश राऊत, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजु ताटे, कोष्टी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश असलेकर, मुस्लिम ओबीसी जिल्हाध्यक्ष रफीक बागवान, गोसावी परिषदेचे अ‍ॅड. राजेंद्र बन, भटक्या विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश कैवाडे, सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष बापुराव भालेकर, जंगम समाजाचे उमेश स्वामी, परिट समाजाचे रमेश घोडके, भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, दत्ता गुणवंत, योगेश कानडे, हेमंत प्रधान यांनी दिला आहे. 
No comments