Breaking News

आ. संदीपभैय्यांची मागणी धनुभाऊंनी लावली मार्गी!


बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामाच्या ८ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान!

मुंबई  : बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी यश मिळवून दिले असून, बीड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामाच्या ८ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज राज्य शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. नवाब भाई मलिक यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मागील आठवड्यात मुंबई येथे बैठक घेऊन ना. मुंडेंनी यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडवून आणली होती. त्यानुसार आज राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाचा कार्यासन अधिकारी श्रीमती संगीता शिंदे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

१९६७ साली बांधण्यात आलेल्या बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत मोडकळीस आली होती, या संस्थेमध्ये जवळपास ७०० हून अधिक विद्यार्थी कौशल्य विकासाचे धडे गिरवतात. परंतु सदर इमारत मोडकळीस आल्याने ती वापरण्यास योग्य नसल्याचे सन २०१२ पासून सांगण्यात येत होते. मात्र तरीही तत्कालीन राज्यकर्त्यांकडून आजतागायत ही इमारत दुर्लक्षित राहिली होती.

आ. संदीप क्षीरसागर यांनी या इमारतीचे पुनर्निमान करण्यासंदर्भात मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व कौशल्य विकास मंत्री ना. नवाबभाई मलिक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता या इमारत बांधकामाच्या आठ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान सदर कामाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून अत्यंत दर्जेदार पद्धतीने या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments