Breaking News

बीड पुर्णतः बंद : रस्ते झाले सुनसान ..!


चौका-चौकात पोलिस - ये- जा करणाऱ्यांची केली जातेय चौकशी

बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. शुक्रवारी बीड शहरासह जिल्हाभरातील शहरे व ग्रामीण भाग पूर्णतः बंद असल्याचं पहावयास मिळाले. शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य झाल्याने सुनसान दिसत होती. शहरातील चौका- चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर निघालेल्या नागरिकांची चौकशी करून पोलिस त्यांना जाण्यास परवानगी देत होते. 

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी सर्वत्र कडकडीत बंद दिसून आला. भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांना दोन तासांचा अवधी देण्यात आलेला असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांची चौकशी करून त्यांना सोडून द्यावे व विनाकारण नागरिकांना मारहाण करू नये, अशा सूचना गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलीसांची भूमिका नरमाईची दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बार्शी नाका, बशीरगंज, जालना रोड, आंबेडकर पुतळा यासह अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बीड शहरासह तालुक्यातील शहरांसह मोठ्या गावांमध्ये लॉकडाऊन कडकडीत पाळण्यात आलेला आहे.

गेवराई शहर कडकडीत बंद

गेवराई शहरातील व्यापार्‍यांचा आणि लोकप्रतिनिधींचा लॉकडाऊनला विरोध असला तरी शहर मात्र आज कडकडीत बंद दिसून आले. शहरासह ग्रामीण भागातील मोठे गावेही बंद होते. 

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कुटे ग्रुपकडून नाश्ता 

शुक्रवारी सकाळ पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सकाळचा नाश्ता म्हणून कुटे ग्रुपच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.
No comments