Breaking News

गावचा कारभार सांभाळून उत्तम शेती करणारे सरपंच कैलास जाधव : एक एकर मध्ये ४ टन बटाट्याचे घेतले उत्पन्न

गौतम बचुटे । केज  

गावच्या राजकारणात एखादा कुणी पडला की, अनेकांचे शेतीकडे दुर्लक्ष होते परंतु केज तालुक्यातील साळेगावचे सरपंच कैलास जाधव यांनी गावचा कारभार सांभाळून देखील आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे दुर्लक्ष न करता स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने एक एकर पेक्षा कमी क्षेत्रात तब्बल चार टन बटाट्याचे उत्पन्न घेतले आहे.

सरपंच कैलास जाधव

साळेगाव ता. केज येथील सरपंच कैलास जाधव यांनी त्यांच्या शेतात मल्चिंग आणि ड्रीप पद्धतीने बेडवर बटाट्याची लागवड केली. गावच्या व्यस्त गावगाड्याच्या कामातूनही सवड काढून स्वतः तसेच पत्नी व भाऊ भागवत जाधव, रामू जाधव व घरातील महिलांसह शेतीकडे वेळ दिला. बटाटा लागवडी पासून ते त्याची फवारणी व अंतर मशागत वेळचे वेळी केली. पिकासाठी खताची मात्रा, पूरक व पोषक औषधी देताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कृषि क्षेत्रातील अनुभवी मित्र आणि बटाटे उत्पादन घेणारे शेतकरी यांचा देखील वेळोवेळी सल्ला घेऊन त्या पद्धतीने मेहनत व मशागत केली.

 रासायनिक खता ऐवजी शेणखत, कंपोस्ट खत जास्त दिले आणि पिकाला पाणी देतानाही आवश्यक तेवढे म्हणजे अगदी मोजून मापून पाणी दिले. बटाटा लागवडी पूर्वी त्यांनी जमिनीतील मातीचे कृषी विभागाकडून माती परीक्षण तर केलेच पण बोअरच्या पाण्याची देखील प्रयोग शाळेकडून तपासणी करून घेतली. तसेच मित्र किडीचे संगोपन आणि शत्रू किडींचा बंदोबस्त केल्याने त्यांना चार टन एवढे उत्पन्न मिळाले आहे.

अबब एकेक बटाटा अर्ध्या किलो पेक्षा जास्त !  

एक किलो वजनात अवघे दोनच बटाटे बसत असून एकेका बटाट्याचे वजन ६०० ग्रॅम म्हणजेच अर्ध्या किलो ग्रॅम पेक्षा जास्त आहे.

No comments