Breaking News

त्या अपघाताने 6 वा बळी घेतला; आंबेसावळीच्या हनुमंत नन्नवरे याचा उपचारादरम्यान मृत्यू

बीड :  मृत्यूचे वाहक बनत बीड - परळी महामार्गावर बेफाम होऊन ट्रकने या मार्गावर पिंपळगाव मोची फाट्यावर आटोरिक्षाला तर घोडका राजुरी शिवारातील तलावात एकाचवेळी छोटा हत्ती व दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील हनुमंत नन्नवरे (वय 27) व राहुल वसंत गुंदेकर (वय 22) हे जखमी झाले होते. यातील हनुमंत नन्नवरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गेल्या 3 दिवसांपासून बीड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालु होता मात्र काल सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

   अपघाताच्या दिवशी एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले होते. हनुमंत नन्नवरे हे त्या अपघाताचे 6 वे बळी ठरले आहेत. एमआयडीसी बीड येथे आंबेसावळी (ता जि बीड) या त्यांच्या गावातून दररोज येणे जाणे करून मजुरी करत असलेल्या हनुमंत नन्नवरे यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या हनुमंत नन्नवरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील, दोन भाऊ, पुतणे - पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्या अपघातात जखमी झालेले अजून 3 पेक्षा अधिक जण दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत.

No comments