Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बरदापुरमध्ये पुतळा उभारण्यास 1 कोटी 32 लक्ष रुपयांच्या निधीस शासनाची तत्त्वतः मान्यता

संग्रहीत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आंदोलनाला यश : आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण

अंबाजोगाई : जातीयवादी मानसिकतेने बरबटलेल्या काही विघ्न संतोषी समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बर्दापूर येथील पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना घडली होती. यामुळे महाराष्ट्रभर आंबेडकरी जनतेमध्ये असंतोषाची लाट पसरली होती. शासनाने याठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा पूर्ववत उभारून त्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी आक्रोश मोर्चा काढून आंदोलन केले होते. दरम्यान त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून बाबासाहेबांचा पुतळा बरदापुरमध्ये उभारण्यासाठी शासनाने तत्वतः मान्यता दिली असून  त्यासाठी १ कोटी ३२ लक्ष ७२ हजार ५८१ रुपयांच्या निधीस बुधवारी (दि.३)  मान्यता दिली आहे.  यामुळे आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील कोलंबिया विश्व विद्यालयात तेथील विद्यार्थ्यांना व जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून सिम्बॉल ऑफ दि नॉलेज म्हणून बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला आहे. मात्र भारतात आणि पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत  बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, घडतायेत. मागच्या काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील बरदापुर गावात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची तोडफोड करून जातीयवादी मानसिकतेने ग्रासलेल्या काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

संग्रहीत

या घटनेनंतर आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झाली होती. दरम्यान याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी समाजाला शांततेचे आवाहन करून त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी पूर्ववत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शासनाने उभारावा. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत  हजारोच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते.

राज्य सरकारने पप्पू कागदे यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत दि. ३ मार्च २०२१ रोजी बरदापुर येथे बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी तत्वतः मान्यता देऊन  १ कोटी ३२ लाख ७२ हजार ५८१ रुपयांच्या निधीला राज्याच्या सामाज कल्याण विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे यांनी मान्यता दिली आहे. कागदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश आल्याने आंबेडकरी जनतेसह बहुजन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मान्यता देऊन निधीची तरतूद केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे,जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, दशरथ सोनवणे, दीपक कांबळे, प्रमोद दासूद, राणी गायकवाड, किशन तांगडे, धम्मानंद पारवे यांनी शासनाचे आभार मानले आहे.

बाबासाहेब बहुजन समाजाची अस्मिता ....


येथील हजारो वर्षांपासूनची जातीय व्यवस्थेची उतरंड बाबासाहेबांनी उध्वस्त केली. म्हणूनचं जातियवादी सडक्या मेंदूच्या मानसिकतेची काही पिल्लावळ बाबासाहेबांचा तिरस्कार करीत असल्याचे बरदापुर येथील घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. मात्र या पिल्लावळीने लक्षात घ्यावे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या एका जातीसाठी मर्यादित नसून समस्त भारतीयांचे उद्धारक- प्रेरणास्थान आहेत. आज ज्ञान तंत्रज्ञानाचे युग असून बाबासाहेब हे समस्त बहुजन समाजाची अस्मिता आहेत. असे प्रकार घडू नयेत, यासाठी शासनाने आशा पिल्लावळींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जेणे करून महापुरुषांची विटंबना करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे म्हणाले. z

No comments