Breaking News

कोण होणार गावचा मुखीया? आज होणार फैसला

परळी तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी  आज आरक्षण सोडत

परळी : परळी तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत शुक्रवार दि .5 फेब्रुवारी 2021 रोजी परळी तहसील कार्यालयात दुपारी 1 वा. होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बी.एल.रुपनर यांनी दिली आहे. दरम्यान आरक्षण सोडतीनंतर गावचा कारभारी कोण होणार? याचाही फैसला आज होणार आहे यामुळे या आरक्षणाच्या सोडतीकडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यसह गावपुढारी व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात  माहिती अशी की, परळी तालुक्यात 74 ग्रामपंचायतींच्या सन 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. 8 डिसेंबर 2020 रोजी प्रशासनाने जाहीर केलेले सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द केले होते. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होत आहे.  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ही आरक्षण सोडत होत असल्याने या सोडतीकडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यासह गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नव्याने होणारी आरक्षण सोडत दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी होत असून परळी तालुक्यातील 74 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत प्रभारी तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे 24 असून यात महिला 12 तर पुरुष 12, खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित पदे 50 असून महिला 25 व पुरुष 25 जागा आहेत. या पद्धतीने तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. 

गावचा कारभारी कोण?आज होणार फैसला

      परळी तालुक्यात 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल परळी तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन जाहीर झाले.  विजयी उमेदवारांनी आपापल्या गावातील स्थानिक पुढारी व पॅनल प्रमुखांसह विजय जल्लोष साजरा केला परंतु आता या नवनिर्वाचित सदस्यांसह पॅनल प्रमुखांचे संपूर्ण लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर केंद्रित झाले आहे परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात होणार आहे दरम्यान या सोडतीनंतर परळी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार व कोणाच्या ताब्यात येणार याचा फैसला आरक्षणाच्या सोडतीनंतर होणार आहे.






No comments