Breaking News

रेवकीत शाळा खोलीच्या बांधकामास प्रारंभ

शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन ; सभापती सविता बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध

गेवराई :   तालुक्यातील रेवकी येथील जिल्हा परिषद शाळा खोली बांधकामाचे उद्घाटन शनिवारी सकाळी येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती सविताताई मस्के, बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान या शाळा खोलीमुळे येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दुर होणार आहे.

      गेवराई तालुक्यातील रेवकी येथील जिल्हा परिषद शाळा खोलीची पडझड झाली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती, शिवाय अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान याची दखल घेत रेवकी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी येथे नवीन शाळा खोली मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.

 दरम्यान सभापती सविताताई मस्के यांच्या विशेष प्रयत्नातून येथील शाळा खोलीसाठी 8 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दुर होणार असुन पालकांमधून सविता मस्के यांचे आभार व्यक्त होत आहेत. या शाळा खोली कामाचा शुभांरभ शनिवारी सकाळी या शाळेत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कु. रुपाली बप्पासाहेब पुळेकर व विद्यार्थी चि. गणेश भारत चोरमले या विद्यार्थ्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के, संतराम चोरमले, कचरू बाबरे, भाऊसाहेब नरोवटे, भाऊसाहेब सौदरकर, गजानन खताळ, बाळराजे चोरमले, निळकंठ चोरमले, शरद चोरमले यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


No comments