Breaking News

दिव्यांग, परित्यक्तांसह विधवा महिलांना शिलाई मशिनचा लाभ द्या

बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांची मागणी

गेवराई :   दिव्यांग, परित्यक्तांसह विधवा महिलांना स्वावलंबन जीवन जगण्यासाठी शिलाई मशिनचा वैयक्तिक योजनेतून लाभ देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांच्याकडे बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिव्यांग, परित्यक्त्या तसेच विधवा महिलांना कुटुंबाचा गाडा चालविताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. जन्मजात दिव्यांग असलेल्या महिलांना रोजगार मिळत नाही. तर घरातील कर्ता पुरुष गेल्याने उघड्यावर पडलेले कुटुंब अगोदरच हतबल असताना या कुटूंबाच्या रोजरोटीचा प्रश्न निर्माण झालेला असतो. तसेच परित्यक्त्या महिलांची देखील हिच आवस्था आहे. या महिलांकडे कला आहे. 

मात्र परिस्थितीमुळे त्या हतबल आहेत. त्यामुळे या महिलांना कलेच्या माध्यमातून स्वावलंबन जीवन जगण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत वैयक्तिक योजनेतून शिलाई मशीन देण्यात यावी. या महिलांना शिलाई मशीनचा लाभ मिळाल्यास त्या यामधून स्वावलंबी होतील, शिवाय त्यांचा सन्मान होईल. तसेच शिलाई मशीनच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना कुटूंबाचा गाडा चालविण्यास हातभार लागून एकप्रकारे सक्षम जीवन जगण्यास समर्थ होऊन समाजासमोर प्रेरणादायी ठरतील असे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी निवेदनात म्हटले असून या महिलांना समाजकल्याण विभागाकडून वैयक्तिक योजनेतून शिलाई मशीन देण्याची मागणी समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.






No comments