Breaking News

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ : दिवसा दुचाकीची तर रात्री घरफोडीची नागरिकांमध्ये भीती !

पोलिसांना चोरट्यांचा लागेना मागमूस; माजलगावकरांमध्ये संताप

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

शहरात मागील सहा महिन्यांपासून रहदारीच्या ठिकाणी दररोज भरदिवसा रोज एक मोटरसायकल तर रात्री घरफोडी असे प्रकार सातत्याने सुरू असून येथील पोलीस यंत्रणा ढेपाळली असल्याने गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिला नाही त्यामुळे दररोज अशा घटना घडत असून शनिवारी नविन बसस्थानकासमोरून पत्रकार सुधीर नागापुरे यांची होंडा शाईन मोटरसायकल सायंकाळी सातच्या दरम्यान लंपास करण्यात आली. मागील पाच दिवसात दररोज एक गाडी चोरीस जात असताना पोलीस तपास शून्य असल्याने  जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे.


 माजलगाव शहरात मागील सहा महिन्यापासून नवीन बसस्थानक, लोकनेते महाविद्यालय परिसर, संभाजी चौक, विवेकानंदनगर, विविध बँका, नागरी वसाहती आदी ठिकाणी दररोज एक मोटरसायकल चोरी होण्याची घटना सातत्याने घडत आहे तर शहराच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या चोऱ्या सातत्याने सुरूच आहेत एखादी दुसरी चोरी पकडून गुन्हेगार पकडल्याचा आव आनुन पोलिस आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार करत आहेत मात्र जनतेच्या मनात भीती निर्माण झालेली आहे, ती दूर करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. छोट्या-मोठ्या कामासाठी खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची पाच मिनिटात मोटरसायकल गायब होते यावरून सराईत गुन्हेगारांची टोळी येथे कार्यरत असल्याचे दिसून येते, त्यामुळे आता मोटरसायकल  कोठे न्यायची तर मोटरसायकल सांभाळण्यासाठी एका व्यक्तीला ठेवावे  लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा मोटर सायकल  व रात्री कोठे ना कोठे चोरी हे समीकरण झाले आहे त्यामुळे विविध भागात रहिवाशांनी गस्त सुरू केल्या आहेत.

ज्यांच्या मोटरसायकल चोरी गेल्या त्या पुन्हा मिळतच नाही त्यामुळे बरेच नागरिक तक्रार देण्यास धजावत नाहीत म्हणूनच चोरट्यांचे फावत असून त्यांना पोलीस यंत्रणेचा कुठलाही धाक न राहिल्याने दररोज अशा घटनामध्ये वाढ होत आहे. याबाबत येथे असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी मात्र कुठल्याही गुन्ह्यांचा आढावा घेताना दिसून येत नाहीत, त्यामुळे येथे असलेले हे पद कामाचे की बिनकामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने अशा चोरट्यांचा तपास लावावा अशी मागणी होत आहे.





No comments