Breaking News

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आष्टीच्या पै. शायानअली शेखची निवड


९२ किलो वजन गटात जिल्ह्यात प्रथम

आष्टी : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर माणूस यशाची पायरी चढतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आष्टीचा भूमिपुत्र पै. शायानअली मतीन शेख हा आहे. चिंचोली येथे बीड जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा व निवड चाचणीत आष्टी शहराचे माजी उपसरपंच मतीन शेख यांचा थोरला मुलगा पै. शायानअली याची अवघ्या सोळा वर्षाच्या वयातच बळेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेमध्ये ९२ किलो वजन गटात पै. शायानअली शेख याने प्रथम क्रमांक मिळवून पुन्हा एकदा आष्टी शहराची मान उंचावली आहे.

          सध्या पै. शायानअली शेख हा येथील पंडित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षण घेत असताना त्याची खेळाविषयी आवड पाहून वडील मतीन शेख यांनी आष्टीचे भूमिपुत्र महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस यांच्या बाबाजी कुस्ती संकूल येथे सरावासाठी पाठवण्यास सुरूवात केली. 

सहा महिण्याच्या सरावादरम्यान तालुक्यातील कडा येथे झालेल्या कुस्तीच्या हगाम्यात शायानने प्रथम कुस्ती खेळून उपस्थितांची मने जिंकली होती. शायानने वस्ताद महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी कुस्त्या खेळून जिंकल्या आहेत. तसेच नागपूर येथे कुमार केसरी स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली होती. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शायानने रौप्य पदक पटकावले आहे. 

शायानची कुस्ती विषयी असलेली आवड, त्याचे परिश्रम पाहून वस्ताद पै. सईद चाऊस यांनी २०२१ मध्ये पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्याची तयारी सुरु केली होती. बीड तालुक्यातील चिंचोली येथे बीड जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये शायानअली याने ९२ किलो वजन गटामध्ये बीड जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या प्रशिक्षणात खरा उतरला असल्याचे सिद्ध केले आहे. शायानअली शेख याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून जागोजागी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहेत. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्याच प्रतिनिधित्व करून शायानअली शेख याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावा या सदिच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.

No comments