Breaking News

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सिरसाळ्यात रास्ता रोको आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा गावागावात जाउन जनजागरण करणार : कॉ अजय बुरांडे

परळी वै. : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी  दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवार (ता.6) रोजी दुपारी 12 वाजता सिरसाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकरी विरोधी तीन्हीही कृषी कायदे रद्द करा, गेल्यावर्षी अतिवर्ष्टिमुळे पिकाचे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान तात्काळ वाटप करा, सन 2020 चे खरीप हंगामातील पिक विमा मंजूर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.6) दुपारी 12 वाजता संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सिरसाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी तीन्ही कृषी कायदयामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. शेती व शेतकरी वाचविण्यासाठी केंद्रीय कृषी कायदे रद्द झाले पाहीजे. कृषी कायदयामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत गावागावात जाउन किसानसभा जनजागरण करणार असल्याचे बुरांडे यांनी सांगीतले.

 या आंदोलनामुळे सिरसाळा येथुन पाच किमी अंतरापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात  किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ मुरलीधर नागरगोजे, शालेय पोषण आहार संघटणेचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भागवत देशमुख, निर्मळ,  माकप चे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, शेतमजुर यूनियनचे कॉ सुदाम शिंदे, विशाल देशमुख, कॉ बालाजी कडभाने, कॉ.पप्पु देशमुख, कॉ. मनोज देशमुख, कॉ. मनोज स्वामी यांचा सहभाग होता.


No comments