Breaking News

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीमय : २२ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड

गेवराई ः- गेवराई तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून आज झालेल्या आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरंपच निवडून आले. तालुक्यात एकुण २४ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्या असून ग्रामीण भागात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

गेवराई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड आज बुधवार, दि.१६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यापैकी तलवाडा, डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी, सुर्डी आणि खेर्डावाडी या पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरपंच अविरोध निवडून आले. सर्वांचे लक्ष लागलेल्या तलवाडा ग्रामपंचायतची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती काबीज केली. तलवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.मिना विष्णू हात्ते यांची तर उपसरपंचपदी शेख अक्रम जैनोद्दीन यांची निवड करण्यात आली. डोईफोडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.स्वाती कृष्णा वाघमोडे यांची तर उपसरपंचपदी अंकुश दामू रोकडे यांची निवड करण्यात आली. चोपड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.अनुसया सखाराम टेहळे यांची तर उपसरपंचपदी उत्तम गिरजापा चोपडे यांची निवड करण्यात आली. सुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.मनिषा महादेव सोळंके तर उपसरपंचपदी सौ.शारदा नामदेव तवले यांनी अविरोध विजय मिळविला, खेर्डावाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.शिवकन्या राजेंद्र वाघमोडे यांची तर उपसरपंचपदी सौ.उर्मिला लक्ष्मण कादे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित व माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आज झालेल्या आठपैकी पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्यामुळे गेवराई तालुक्यातील एकुण १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामीण भागातही आपली ताकद पुन्हा एकदा वाढवली आहे. येणार्या काळामध्ये राष्ट्रवादीचा विचार घराघरात पोहोचवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी माजी आ.अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे हात बळकट करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान सरपंच व उपसरपंच निवडीनंतर तलवाडा, डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी, सुर्डी आणि खेर्डावाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. 

No comments