सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिलेले सात शेतकरी बेपत्ता ; त्यांच्या जिविताचे बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण ?
राष्ट्रवादीच्या युवा आघाडीचे मुकुंद कणसे यांचा प्रशासनाला सवाल
गौतम बचुटे । केज
केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ऊस तोड रखडली आहे. ऊसतोड रखडलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर उसाच्या फडातच सामूहिक आत्मदहनाचा ईशारा दिला होता. मात्र दोन दिवस उलटूनही प्रशासनाने कार्यवाही न झाल्यामुळे त्रासलेले ते सात शेतकरी रात्री पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या जिविताचे काही बरे वाईट झाले; तर त्याला जबाबदार कोण? असा जळजळीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा तालुका अध्यक्ष मुकुंद कणसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाला विचारला आहे.
केज तालुक्यातील शेतकरी महादेव ईखे, अनंत कणसे, मारुती कणसे, रामेश्वर गुळवे, शिवाजी ईखे, पांडुरंग ईटकर, चांगदेव यादव यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले असून म्हटले आहे की, सोनेसांगवीच्या शिवारातील गट नं सर्व्हे नं १५, २१, २२ आणि २५ मध्ये ऊस लागवड केली आहे या उसाला जवळ जवळ एक वर्षा पेक्षा जास्त मुदत झाली असून १३-१४ महिने लोटले आहेत.
मात्र शेजारील काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घ्यावा. अन्यथा चार दिवसात जर रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर शेतातील उसाच्या फडात सामुदायिक आत्मदहन करण्याचा ईशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. या वर आता दोन दिवस उलटून गेले तरी प्रशासना कडून साधा पंचनामा किंवा पहाणी देखील करण्यात आली नाही यामुळे उद्दीग्न झाल्याले ते सात तरुण शेतकरी बेपत्ता झाले असून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांचे नातेवाईक घाबरून गेले आहेत. एवढे होऊनही प्रशासन मात्र बेफिकीर असून अद्यापही कार्यवाही होत नाही.
राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष मुकुंद कणसे यांनी विचारले प्रशासनाला प्रश्न
रस्ता प्रकरण निकाली निघण्या ऐवजी तारीख पे तारीख का?
आज पर्यंत तहसीलदार किंवा अधिकाऱ्यांनी भेट का दिली नाही?
रस्ता मिळू न देण्या मागे कुणाचा हात?
शेतकऱ्यांच्या जिवांचे बरे वाईट झाल्यास तरी न्याय मिळेल का?
No comments