Breaking News

पंचशीलनगर, पालवण चौक रस्ताकामाला उशीर करणाऱ्या कंत्राटदारांवर नगरपरिषदेने कारवाई करण्याचा ठराव मंजूर करावा - जिल्हाध्यक्ष अशोक येडे


नगरपरिषदेचे नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष फक्त उद्घाटने करायला आहेत का?

हा रस्ता मुख्याधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक होऊ द्यायचा नाही का?

बीड : बीड शहरातील पालवण चौक ते खोलवाट, पंचशील नगर येथील रस्ताकाम जलदगतीने करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पक्षाने निवेदनाद्वारे दि ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती. या रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले आहे मात्र पुढील काम मात्र सुरु केलेले नाही. यामध्ये पडून एका युवकाचा देखील मृत्यू झालेला आहे. नागरिकांना दळणवळणासाठी देखील येथे प्रचंड त्रास होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी रस्ता नाही. गेल्या १० वर्षात तर या रस्त्याला येण्याचे देखील नागरिकांनी टाळले आहे. रस्त्याच्या कामाला गती आणण्याबाबत आम आदमी पक्षाने केलेल्या मागणीला नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यानी दिलेले उत्तर हे अतिशय आश्चर्यकारक असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी म्हंटले आहे. 

  ज्याप्रमाणे नगरपरिषदने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामासंबंधी दिरंगाई करण्याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेत ठराव घेऊन मंजूर करण्यात आला, त्याचप्रमाणे पंचशीलनगर, पालवण चौक रस्ताकामाला उशीर करणाऱ्या कंत्राटदारांवर नगरपरिषदेने कारवाई करण्याचा ठराव मंजूर करावा मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी व संपूर्ण नगरपरिषदचे नियंत्रण या रस्त्यावर असताना चक्क पत्राद्वारे आम्हीच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे उत्तर आश्चर्यकारक आहे! 


या भागातील नागरिकांना होणारा त्रास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? याच्यातून स्पष्ट होत आहे कि संबंधित कंत्राटदाराला वाचवण्यासाठी नगरपरिषद ठराव न घेता, कुठलेही पत्र न देता नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या कामात जाणीवपूर्वक उशीर करत आहेत. नगरपरिषद नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधी नुसते उदघाटन करण्यासाठी आहेत का? असा प्रश्न यातून सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. येत्या ८ दिवसांत या रस्त्याच्या कामाला गती आणावी, कंत्राटदाराला अभय देण्याऐवजी कारवाईचा ठराव पारित करावा, नियंत्रक म्हणून व हद्दीत काम असल्याने नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतः पत्र देऊन सूचित करावे अन्यथा येथील स्थानिक नागरिकांसोबत आम आदमी पक्षाला या ठिकाणी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करावे लागेल असा इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिला आहे.
No comments