Breaking News

निकृष्ट रस्ता काम रोखण्यासाठी नागरिकांचा रस्त्यावरच ठिय्या!


आष्टी ते आयटीआय काॅलेज रस्ता, कामात डांबराचा अत्यल्प वापर

आष्टी : बांधकाम विभागाच्या अभियंत्याशिवाय शहरापासून आयटीआय काॅलेजपर्यंत सुरू असलेल्या डांबरी नूतनीकरणाच्या कामात अत्यल्प डांबर वापरून निकृष्टपणे सुरू असलेले काम परिसरातील नागरिकांनी शनिवारी (ता. 27) रोखून रस्त्यावरच ठिय्या मांडला. 

आष्टी शहरापासून शिदेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयटीआय काॅलेजपर्यंत डांबरीकरणाचे काम गेल्या तीन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. या डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी नियमानुसार खोदकाम करून मुरूम पसरविणे, पाणी मारून दबई करणे व नंतर खडी पसरविल्यानंतर दबई झाल्यानंतर डांबराच्या सहाय्याने मजबुतीकरण डांबरीकरण करणे आवश्यक आहे.

मात्र, संबंधित कंत्राटदाराने पूर्वीच्याच खड्डेमय रस्त्यावर खडी अंथरली असून त्यामध्ये अत्यल्प डांबर वापरून थातुरमातूर पद्धतीने हे काम सुरू केले आहे. परिसरातील संजयनगर, लक्ष्मीनगर व सुंदरनगर भागातील रहिवाशांच्या ही बाब लक्षात येताच सर्वांनी मिळून शनिवारी (ता. 27) सकाळी हे काम बंद पाडले. दरम्यान, या कामावर बांधकाम विभागाचे अभियंता अथवा कंत्राटदाराचा मुकादमही हजर नव्हता. केवळ मजुरांकरवी सुरू असलेले हे निकृष्ट काम परिसरातील अनिल कांबळे, अण्णा विटकर, विशाल रंधवे, रणजित गुप्ता, विनोद गायकवाड, अण्णा साठे, सागर कांबळे, नितीन वाघमारे, महेंद्र वाघमारे, अजित राऊत, राजेंद्र राऊत, फेरोज आतार, किरण नन्नवरे, शाम वाल्हेकर, सिद्धांत योगे, संदीप शिरोळे, प्रदीप सुर्वेकर, रामदास जाधव, बाळू चव्हाण, अकील कुरेशी आदींनी रस्त्यावर ठिय्या मांडून थांबविले. अभियंता कामावर आल्याशिवाय व दर्जा राखविल्यावाय हे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा या रहिवाशांनी घेतला आहे.

काम नेमक्या कोणत्या विभागाचे?

दरम्यान, हाती घेण्यात आलेले हे काम कोणत्या विभागाकडून सुरू आहे, याचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल जोरवेकर यांच्याशी संपर्क केला असता सदरील काम हे प्रधानमंत्री ग्रामसडक विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले. या विभागाचे अभियंता दिलीप पालवे यांनीही शहरानजिक असलेली कामे आमची नसतात असे सांगितले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री. तळेकर यांनीही काम आमच्याकडे नाही, असे सांगितल्याने हे काम नेमक्या कोणत्या विभागाचे आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments