Breaking News

चंद्र - सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा लौकिक राहील - धनंजय मुंडे


शिवजयंतीनिमित्त दिल्या जनतेस शुभेच्छा; कोरोनाविषयक नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन 

परळी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा लौकिक चंद्र - सूर्य आहेत तोपर्यंत राहील. महाराजांचे शौर्य, त्यांची शासनपद्धती, त्यांची युद्धनीती या सर्वच बाबी आदर्श असून त्यांना मानाचा मुजरा करतो, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे.

बीड जिल्ह्यासह राज्यातील जनतेस ना. धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या उत्साहात एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करत असतो. अनेक दिवसांपासून शिवप्रेमी मावळे या दिवसाची वाट पाहत असतात. मागील वर्षीही बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली होती. परंतु मार्च - २०२० मध्ये कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि परिस्थिती बदलली. देशभरात लॉकडाऊन लागू झाले. यादरम्यान आलेल्या अनेक सण-उत्सवांना, सार्वजनिक कार्यक्रमांना निर्बंध लागू झाले. या काळातील गेल्या नऊ अधिक महिन्यात बीड जिल्ह्यातील नागरिकांनी कमालीची शिस्त व संयम पाळला. अनेक धार्मिक सण, उत्सव, महापुरुषांची जयंती - पुण्यतिथी, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा असे अनेक कार्यक्रम केवळ घरच्या घरी साजरे केले. यामुळे कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यात मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणेला मदत मिळाली.

यावर्षीच्या शिवजयंतीच्या काळातही कोरोनाचे सावट घोंगावत आहे. शिवजयंती जरूर साजरी करा, मात्र यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे, सामाजिक अंतर राखणे व मास्क वापरणे आवश्यक आहे, काही जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळत आहे, आपल्या बीड जिल्ह्यात ही परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्वांनी गांभीर्यपूर्वक काळजी घेण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे तर एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. प्रजेवर कुटुंबाप्रमाणे प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल, प्रेरक व स्फूर्तिदायी राज्यकर्ते होते. त्यांच्या स्मृती या आमच्यासाठी सदैव प्रेरणा आहेत, त्यांना त्रिवार वंदन करतो, असेही ना. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
No comments