Breaking News

लाडझरी येथे शहीद महेश तिडके यांच्या स्मारकाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

शहीद महेशच्या स्मारकाची व कुटुंबाची जबाबदारी माझी - ना. मुंडे

लाडझरी/अंबाजोगाई  : अंबाजोगाई तालुक्यातील लाडझरी येथील शहीद महेश तिडके या वीर जवानाच्या स्मारकाचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शहीद स्मारकासाठी गावचे नवनिर्वाचित सरपंच शिरीष नाकाडे यांनी आपल्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक गुंठा जमीन दान केली असुन, याच जमिनीवर हे स्मारक उभारण्यात येत आहे.

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात पंजाब मधील भटिंडा येथे सेवेत असताना महेश यशवंत तिडके यांना अपघातात वीरमरण आले होते. महेश ने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यात नोकरी मिळवली, देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याच्या स्मारकामुळे या परिसरातल्या तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळेल म्हणूनच हे स्मारक उभे करण्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वतःकडे घेतली असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

गावचे सरपंच शिरीष नाकाडे यांनी गावातील पिण्याच्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी लाडझरी ग्रामस्थांना येणाऱ्या एक वर्षाच्या आत पिण्याच्या पाण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे.

शहीद महेश यशवंत तिडके यांसारख्या भूमीपुत्रांचा मला अभिमान आहे, या स्मारकाचे काम येत्या एक वर्षाच्या आत पूर्ण केले जाईल, तसेच शहीद महेश यांच्या कुटुंबाची जबाबदारी देखील आपणावर घेत असल्याचे यावेळी धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.


No comments