Breaking News

अजित कुंभार साहेब केज पंचायत समितीचे अधिकारी तुमच्या नोटिशीला जुमानत नाहीत काय?


केज पंचायत समिती नरेगाच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरण

आठवडा लोटला नोटीस येऊन तरी त्या ग्रामसेवक, रोजगार सेवक, सरपंच आणि अधिकाऱ्यांना न देता कार्यालयातच !

पंचायत समिती अधिकाऱ्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात पंचायत समिती केज अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या अनियमितता आणि कथित भ्रष्टाचार या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी एक आठवड्या पूर्वी नोटिसा दिल्या असून त्या नोटिसा अद्याप पर्यंत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामरोजगार सेवक व इतर अधिकाऱ्यांना वाटप केल्या गेल्या नसून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला केज पंचायत समिती झुगारून लावीत असल्याचे दिसून येत आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामातील अनियमितता आणि कथित भ्रष्टाचार या बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षते खालील पथकाच्या दि . ३० डिसेंबर २०२० च्या चौकशी आहवाला नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, शाखा अभियंते यांचेवर सोपविलेली असून ग्रामीण भागामध्ये मजुरांच्या हाताला काम मिळावे. त्यांची उपजिवीका सुलभ व्हावी. या हेतूने शासन रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना रोजगार मागणी प्रमाणे काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आलेली आहे. 

असे असतानाही केज तालुक्यातील अनेक गावांत या योजने अंतर्गत झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवल्याचे दिसून येत नाही. चौकशी समितीला ग्रामपंचायत बाबत गंभीर अनियमितता दिसून आलेली आहे. त्या नुसार १०८ ग्रामपंचायती, १०८ सरपंच, १०८ ग्रामरोजगार सेवक, ६९ ग्रामसेवक, नागरगोजे, तावरे, खेडकर व सय्यद हे चार शाखा अभियंते, अशोक निरडे व गायकवाड हे दोन विस्तार अधिकारी आणि दत्तात्रय दराडे व रवींद्र तुरूकमारे हे दोन गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. सात दिवसात खुलासा करण्याचे कळवून देखील अद्याप केज पंचायत समितीने नोटिसाच बजावल्या नाहीत. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचा आदेश केज पंचायती जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती न देता टाळाटाळ करून लपवा छपवी केली जात असल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments