Breaking News

खामगाव-पंढरपूर रस्त्यावर केज मध्ये मेल कंपनीमुळे वाहतुकीचा प्रचंड अवमेळ

पर्यायी वळण रस्त्यावर खड्डे आणि चिखल : वाहतुकीची कोंडी

रस्त्यावर लागताहेत एक ते दीड किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड रांगा

गौतम बचुटे । केज  

मेल कंपनीच्या बेफिरीमुळे केज मध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून पर्यायी वळण रस्त्यावर खड्डे व चिखलामुळे निसरड्या रस्त्यावर वाहन चालविणे खूप अवघड झाले आहे.

केज मधून जाणारा खामगाव पंढरपूर या ५६८-सी रस्त्यावर केज येथे मेल कंपनीच्या बेफिकिरी आणि चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशी व वाहनधारकांना प्रचंड गैरसोय आणि मनःस्ताप होत आहे. लेंडी नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी वाहतुकीसाठी बाजार समिती मधून काढलेल्या रस्त्यावर लोखंडी गज उघडे पडले आहेत. तसेच नाली खचून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने पूर्ण अर्ध्या कि.मी. चा रस्ता चिखलमय आणि निसरडा झालेला आहे. त्यामुळे अवजड व उसाने भरलेले ट्रॅक्टर हे या रस्त्यावर घसरत आहेत. तसेच दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. या पर्यायी रस्त्यावर मेल कंपनीने काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता अपघाती रस्ता झाला आहे. त्यामुळे सुमारे एक ते दीड किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या प्रचंड दुतर्फा रांगा लागत आहेत. मेल कंपनीने याची दखल घेऊन तात्काळ पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

..तर आंदोलन करू : प्रा. भोसले

"जर कंपनीने रस्ता दुरुस्त केला नाही आणि नियमा प्रमाणे पर्यायी रस्त्यावर सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर केज मध्ये आम्हाला आंदोलन करून जाब विचारावा लागेल." असे सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले म्हणाले.  

No comments