Breaking News

बेवारस प्रेताची मरणा नंतरही उपेक्षाच...

उत्तरीय तपासणीला नेण्यासाठी वाहन मिळेना ; वैद्यकीय अधिकारी स्पॉट पीएम करीना तसेच अंत्यविधीसाठी घंटा गाडीतून प्रेत नेण्याची पोलीसांवर वेळ

गौतम बचुटे । केज

मरणाने केली सुटका जगण्यानेही छळले होते असे कवि कसुमाग्रजांनी वर्णन केले आहे. अशीच एक हृदय हेलवणारी घटना केज मध्ये घडली.


दि. ६ फेब्रुवारी रोजी केज येथील भिमगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या एका ओढ्यात पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले. याची माहिती एका शेतकऱ्यांने पोलीसांना कळविताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे, वैभव राऊत व पप्पू अहंकारे यांनी नगर पंचायतचे कर्मचारी अमर हजारे, दस्तगिर कुरेशी, धम्मापाल मस्के, फरहान देशमुख, पाशा फारोकी, प्रमोद लांडगे व शेख खुदबुद्दीन यांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले.  प्रेत पूर्णतः सडलेले होते व जलचर प्राण्यांनी त्याचे पूर्ण मांस खाऊन टाकलेले आणि सडलेले होते. त्यामुळे त्याची प्रचंड दुर्गगंधी येत होती. आशा अवस्थेतही पोलीसांनी कर्तव्य भावनेने मोबाईलच्या टॉर्चच्या मिणमिणत्या उजेडात स्थळ पंचनामा व चौकशी पंचनामा केला. सदर प्रेताचे जागीच शवविच्छेदन म्हणजे स्पॉट पीएम होणे आवश्यक होते; परंतु उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यास असमर्थता दर्शविली. मग ते प्रेत उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणीही वाहन उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे पोलीस आणि नगर पंचायच्या कर्मचाऱ्यांना रात्री सुमारे १०:०० वाजेपर्यंत ताटकळत थांबावे लागले. 

नंतर एक वाहन चालक तयार झाला. प्रेत उपजिल्हा रुग्णालयात आणले त्या वेळी डॉक्टर म्हणाले की, त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही प्रेत अंबाजोगाईला हलवा. ही माहिती पोलीस निरीक्षक यांना कळताच त्यांनी वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी सदर प्रेताचे शवविच्छेदन येथेच करा असे कळविले. त्या रात्रभर उपजिल्हा रुगण्यातील शवगृहात प्रेत ठेवून त्यावर दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० शवविच्छेदन करण्यात आले. मात्र त्या नंतरही त्या अनोळखी प्रेत आणि पोलिसांच्या मागे असलेल्या समस्या सूटत नव्हत्या. कारण अनोळखी प्रेतावर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत स्मशान भूमीपर्यंत नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अखेर मग सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी केज नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांच्याशी चर्चा करून ते प्रेत अखेर घंटा गाडीतून स्मशानभूमीत आणले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने खड्डा खोदून प्रेतावर सर्व विधी व पूजा अर्चा करून पोलीस अधिकारी संतोष मिसळे, मंगेश भोले, पप्पू अहंकारे, आणि पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार संतोष गालफाडे आणि नगर पंचायतचे अमर हजारे व कर्मचारी अंत्यसंस्कार केले.

" मयत हा अनोळखी असला तरी त्याच्या वर अंत्यसंकार करताना सर्व मानवतेच्या भावनेने आम्ही सर्व सोपस्कार पार पाडले." असे सपोनि संतोष मिसळे म्हणाले.

पोलीस अधिकारी संतोष मिसळे यांनी अनोळखी प्रेतावर अंत्यसंस्कार करताना पुष्पहार, पुष्प, गुलाल उदबत्ती लावून विधिवत सर्व विधी पार पाडल्या आणि श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच कार्यवाही केली; परंतु आरोग्य विभाग आणि प्रेत वाहून नेण्यासाठी व्यवस्था यामुळे प्रेताची अवहेलना झाली. मात्र यावेळी पत्रकार गौतम बचुटे, संतोष गालफाडे वगळता कोणी राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ता पुढे आले नाहीत.


No comments