Breaking News

अ. भा. वी. लिं. महासंघाच्या ९ व्या वर्धापनदिनी करवीर नगरीत वीरशैवांचा राज्यव्यापी मेळावा उत्साहात

वीरशैवांना लिंगायत धर्मात ओढणाऱ्या अपप्रवृत्तींवर महासंघाचा हल्लाबोल

संतोष स्वामी । बीड

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा 9 वा वर्धापन दिनानिमित्त लिंगायत जनजागृती मेळावा  व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील अक्कमहादेवी सभागृहात शनिवारी संपन्न झाला. राज्य भरातील हजारो वीरशैव समाजबांधव या कार्यक्रमास उपस्थित झाल्याने महामेळाव्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. वीरशैव समाजाला  हिंदू धर्म सोडुन लिंगायत धर्मात ओढणाऱ्या अपप्रवृत्तींवर महासंघाद्वारे हल्लाबोल या कार्यक्रमात करण्यात आला. 


२०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या या वर्धापनदिनाकडे औत्सूक्याने पाहिले जात आहे. या बाबत महासंघाची भूमिका मांडतांना प्रवक्ते डॉ.विजय जंगम म्हणाले, वीरशैव समाज हा हिन्दू धर्माचाच एक भाग असल्याने हिन्दू पासून त्याला वेगळे करता येत नाही. मात्र, राजकीय हेतूने प्रेरित झालेली समाजातील काही मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करीत असून येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात आपला धर्म लिंगायत असे लिहिण्यासाठी समाजाला सांगून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करीत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडुन आपला धर्म सोडू नये. जनगणनेचा फॉर्म भरतांना धर्माच्या रकाण्यात आपला धर्म हिन्दू असल्याचेच नमूद करावे. हिन्दू धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पध्दती आहे. त्यामुळे याकडे समाज बांधवांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व शिवभजनाने झाली.  डॉ.निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर,  प.पू.डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधामकर, प.पू.श्रीगुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, प.पू. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर आदी पंचाचार्यांसह वस्त्रोद्योग महासंघाचे राज्याध्यक्ष अशोक स्वामी, सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दराम सालिमठ, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ,इचलकरंजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, औरंगाबाद म्हाडा माजी सभापती संजय केणेकर, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ अध्यक्ष भिवलिंग स्वामी,कार्याध्यक्ष विजय जंगम, महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई जंगम,करुणाताई स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. 

जन्मतः हिंदू म्हणून नोंद असलेल्या वीरशैव समाजाला येत्या जनगणना नोंदणी प्रसंगी काही अपप्रवृत्ती लिंगायत धर्म म्हणून नोंद करण्यासाठी चुकीचे अवाहन करत आहेत. या अपप्रवृत्तींच्या विरोधात या मेळाव्याच्या माध्यमातून एल्गार करत हिंदू म्हणून जन्मलो आहोत हिंदू म्हणूनच मरणार असल्याचा सुर उमटत होता. शिवाचार्यांवर होणाऱ्या हल्यांचा निषेध करत येत्या काळात समाजबांधवांनी समाज विदोषी लोकांविरुद्ध एक होत लढा देणे गरजेचे असल्याचे मत अ भा वीरशैव लिंगायत महासंघाद्वारे करण्यात आले. 

वर्धापनदिनाच्या अनुषंगाने वीरशैव समाजात आपल्या कार्याची विशेष छाप सोडणार्‍या पुणे येथील शरद गंजीकर, जेष्ठ साहित्यिक आणि वीरशैव संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक शामाताई घोणसे, कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे, हिन्दू आणि वीरशैव एकच या पुस्तिकेचे लेखक सोलापूर येथील सिध्दाराम पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रशासकीय तथा सामाजीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, स्पर्धा परीक्षेसाठी सातत्याने विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत असल्याबाबत प्रशासकीय अधिकारी या देशाला देणारे  मनोहर भोळे सर यांना विशेष कार्यगौरव, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे यांना समाजभूषण, सामाजिक कार्यकर्ते किशोर बाळासाहेब पाटील यांना समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामिगरीसाठी पत्रकार परमेश्वर लांडगे यांना निर्भिड पत्रकार आणि साहित्यरतन, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ. महेश रेवाडकर यांना वैद्यकिया सेवारत्न, बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील पत्रकार संतोष स्वामी यांना विशेष कार्यगौरव, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कोल्हापूर येथील वीरशैव अर्बन मल्टीपर्पज निधि बँकेचे चेअरमन संतोष जंगम यांना सहकाररत्न, कोल्हापूर येथील पत्रकार बाळकृष्ण सांगवडेकर यांना उत्कृष्ट साहित्यिक, सागर माळी यांना कार्यगौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ मिनल जंगम व अजित जंगम यांनी केले. महासंघाचे प्रवक्ते सचिव वैजनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करत यशस्वी संपन्न केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments