Breaking News

पूजा चव्हाण प्रकरणी बीडमध्ये भाजपाने केले ना.संजय राठोडच्या पुतळ्याचे दहन

महाविकास आघाडीतील मंत्रीच करू लागले महिलांवर अत्याचार- राजेंद्र मस्के 

बीड : सध्या संपूर्ण राज्यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण गाजत आहे. वीस दिवस उलटूनही साधा एफआयआर कोणाच्याही विरोधात नोंदवलेला नाही. या महिला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मयत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज कथित मंत्री ना.संजय राठोड यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

यावेळी भाजपाचे नगरसेवक जगदीश गुरखुदे,किरण बांगर,डॉ.लक्ष्मण जाधव,शांतीनाथ डोरले,डॉ.जयश्रीताई मुंडे,लताताई बुंदेले, अनिता जाधव,भूषण पवार,बालाजी पवार,हरीष खाडे,नागेश पवार,कपिल सौदा,दत्ता परळकर,विलास बामणे,अमोल वडतिले,विलास सातपुते,कल्याण पवार,शाम कोटुळे,बाळासाहेब घोलप,गणेश तोडेकर,बद्रीनाथ जटाळ,महेश सावंत,शरद बडगे,प्रल्हाद चित्रे आदी उपस्थित होते.

या प्रकरणी प्रतिक्रिया देताना राजेंद्र मस्के म्हणाले कि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सर्वात अगोदर माझ्या जिल्ह्यातील मयत पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूची चौकशी होऊन पुजाला न्याय मिळाला पाहिजे अश्या भावना व्यक्त केल्या होत्या.परंतु दुर्दैवाने वीस दिवस होऊनही अद्याप याप्रकरणात साधा गुन्हा देखील नोंद झालेला नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या दिशेने पुरावे समोर येत आहेत. फोनद्वारे झालेल्या संवादाच्या ऑडीओ क्लिप समाजात वायरल झाल्या आहेत. तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. 

या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे येथे घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. संबधित पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मयत पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. परंतु सरकार व प्रशासनाकडून हे प्रकरण दाबून टाकण्याचा डाव दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी कडून या प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजरोसपणे महिलांवर अन्याय अत्याचार करतील व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असतील तर महिला सुरक्षा व सन्मान डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टी कदापि अन्याय सहन करणार नाही.

 चुकीने वागणारा कोणताही माणूस हा गुन्हेगार असतो. मग तो मंत्री असो किंवा सामान्य व्यक्ती असो. संविधाना समोर सर्व समान आहेत. संविधानातील कायद्याची पायमल्ली कोणत्याही परीस्थितीत होता कामा नये. पोलिसांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या वायरल झालेल्या सर्व ऑडीओ क्लिपची तपासणी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी व मयत तरुणी पूजा चव्हाणला न्याय प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय राठोड यांना मंत्री मंडळातून काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मंत्री संजय राठोड यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.

No comments