Breaking News

बलभीमननगर मधील रस्ता दुरुस्तीचे रखडलेले काम न केल्यास ; पालिकेविरुद्ध रस्त्यातील खड्यात बेशरमाची झाडे लावून करणार आंदोलन : भैय्यासाहेब मस्के


रस्त्यात खड्डेच -खड्डे, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन काढावा लागतोय मार्ग

पालिकेचे दुर्लक्ष, वाहनधारकांसह नागरिक त्रस्त..!

बीड  : येथील पालिकेने शहराचा  विकास व नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या नावावर वेठीस धरण्याचे काम केलं आहे. बलभीम नगर येथील मुख्य रस्ता पाईप लाईन साठी वर्षभरापूर्वी खोदला होता. मात्र त्यानंतर अद्यापही रस्ता दुरुरस्ती करण्यास पालिकेतील राज्यकर्त्यांना मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्यावरून ये- जा करतांना वाहनधारकांनासह नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होऊ लागल्याने वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लगत आहे. रस्ता दुरुस्तीचे रखडलेले काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा पालिका प्रशासना विरुद्ध रस्त्यातील खड्यात बेशरमाची झाडे लावून  आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइं (आ) चे युवानेते भैय्यासाहेब मस्के यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की बीड शहर आणि नाळ नाळवंडीकडे बलभीमननगर मधून जाणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर रात्र दिवस हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र सुमारे दोन वर्षांपूर्वी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर रस्त्याची मात्र वाट लागली असून रस्त्यावर खड्डे आणि दगड असल्याने वाहनधारकांना खडतर प्रवास करावा लागत आहे तर पादचाऱ्यांना चालणेही मुशिकल झाले आहे.  रस्त्यात खड्डा अशी अवस्था  झाली आहे.  दरम्यान कोविडमुळे शासकीय रुग्णालय आदित्य दंत महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आले. यामुळे रुग्णांना याच रस्त्याने घेऊन जावं लागतं आहे. पाईप लाईनचे काम झाल्यानंतर रस्ता करणे क्रमप्राप्त होते. परंतु अद्याप ही रस्ता दुरुरस्तीचे काम करण्यात आले नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून परिणामी वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

रस्त्यावरील खड्यांमुळे अनेकजण त्यात पडून जखमी झाले आहेत. यामुळे पालिका प्रशासन व राजकर्त्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. मात्र रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास पालिका प्रशासनाला व राज्यकर्त्यांना मुहूर्त कधी सापडणार असा प्रश्न नागरिकांसह वाहनधारकांमधून उपस्थित केला जात रस्ता दुरुस्तीच्या कामाला तत्काळ सुरवात करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे. 

चढाओढीच्या राजकारणामुळे बीडकरांना धरलं जातंय वेठीस : भैय्यासाहेब मस्के


दोन वर्षांपूर्वी बलभीमननगरचा रस्ता नवीन पाईपलाईन व भुयारी गटार करण्यासाठी पालिकेने खोदला होता. मात्र हे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम करणं अपेक्षित होते, परंतु ते केले नाही. काका- पुतण्याच्या चढाओढीच्या चाललेल्या राजकारणामुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे.  त्यामुळे बीड बलभीम नगरच नव्हे तर शहरातील विविध भागात रस्ते, नाल्या व परिसरातील अस्वच्छत्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र निर्ढावलेले काका- पुतणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तीच री ओढत असून नागरिकांना झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं आहे. मात्र बीडची सुजाण जनता त्यांच्या काव्याला  भीक घालणार नसल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) नेते भैय्यासाहेब मस्के यांनी म्हटले असून बलभीम नगर येथील रस्ता दुरुस्तीचं काम न केल्यास रिपाईच्या वतीने पालिकेविरुद्ध रस्त्यातील खड्यात बेशरमाची झाडे लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

O
No comments