Breaking News

जागृती पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा.शोभा शेळके जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित

परळी वै. :  अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने  दि.६ फेब्रुवारी रोजी येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा.शोभाताई गंगाधरराव शेळके यांना ‘जिजाऊरत्न’ पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब देशमुख हे होते.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या महिलांना ‘जिजाऊरत्न’ पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या १६ महिलांना जिजाऊरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार दि.१२ जानेवारी २०२१ रोजी संगम येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात १५ महिलानंा जिजाऊरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.  परंतू या कार्यक्रमास प्रा.शोभाताई शेळके या हजर राहू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना जागृती पतसंस्थेत आयोजित कार्यक्रमात जिजाऊरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.बालासाहेब देशमुख तर प्रमुख पाहूणे म्हणून वैजनाथराव सोळंके, अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, तालुका अध्यक्ष  ह.भ.प.विश्वांभर महाराज उखळीकर, भानुदासराव कदम, यशवंतराव चव्हाण, प्रल्हाद सावंत, गोविंद भरबडे,  अलकाताई शिंदे, राजेश मगर, बालाजी रामगिरवार, सुनिल बोरकर यांच्यासह व्यापारी व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हेमंत कुलकर्णी यांनी केले.

यावेळी बोलतांना प्रा.शोभाताई शेळके यांनी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या नावाने दिला जाणारा ‘जिजाऊरत्न’ पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा व प्रेरणादायी असल्याचे सांगून यापुढे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा व उर्जा मला मिळाली असल्याचे सांगितले.  तसेच यावेळी बोलतांना प्रा.गंगाधरराव शेळके सर यांनी अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे हे विविध सामाजिक उपक्रमासह सतत विविध  कार्यक्रम राबवित असल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. वैजनाथराव सोळंके यांनी बोलतांना प्रा.शोभाताई शेळके यांच्या कार्याचा उल्लेख करतांना जागृती पतसंस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवल्यामुळेच परळी शहर व परिसरातील उद्योजक, व्यापारी, कर्मचारी यांना आर्थीक सहकार्य मिळत असून असंख्य कर्मचार्‍यांचे कुटूंबांना आधार मिळाला आहे हे मोठे काम प्रा.शेळके मॅडम व प्रा.शेळके सर यांच्याकडून झालेले आहे त्यामुळेच या जिजाऊरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्याचे सांगितले.  तसेच यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना मा.बालासाहेब देशमुख यांनी प्रा.शोभाताई शेळके यांच्या जीवनकार्याचा सविस्तर पट मांडतांना प्रा.शेळके मॅडम व प्रा.शेळके सर यांचे कार्य परळीकरांसाठी अत्यंत प्रेेरणादायी असल्याचे सांगून मी त्यांचा एक विद्यार्थी या नात्याने त्यांच्या कार्याचा मला खूप अभिमान असल्याचे सांगितले.

यावेळी प्रास्ताविक करतांना ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी वारकरी मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या आमच्या प्रेरणास्थान जागृती पतसंस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा प्रा.शोभाताई शेळकेताई यांना पुरस्कार देतांना खूप अभिमानास्पद वाटत असल्याचे सांगून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.


No comments