Breaking News

मा.आ.सय्यद सलीम यांनी विकास केलेल्या सय्यद अली नगरचे तीन-तेरा वाजविण्याचे कार्य नगराध्यक्षांनी पूर्ण केले !

अर्धा डझन नगरसेवक सुद्धा मागे नाहीत - सय्यद इलयास 

बीड : माजी आमदार सय्यद सलीम यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर निर्माण झालेल्या सय्यद अली नगर या मुहम्मदिया कॉलनी परिसरातील प्रभागाचे विकास कार्य जेव्हा सलीम भाईंनी केले होते, तेव्हा तत्कालीन तथा विद्यमान नगराध्यक्ष असलेल्यांनी म्हटले होते की, सलीम यांनी विकास केलेल्या सय्यद अली नगरला मी पुन्हा पहिल्यासारखे रूप (भकास) दिल्याशिवाय राहणार नाही असा प्रण केला होता. आज सय्यद अली नगर सह संपूर्ण मुहम्मदिया कॉलनीचे भकास झालेले रुप पाहून त्यांनी आपला प्रण पूर्ण केला असून यासाठी त्यांना येथील एक दोन नाही तर अर्धा डझन नगरसेवकांची साथ मिळाली असल्याची चर्चा लवकरच येऊ घातलेल्या बीड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 19, 20, 21 या तिन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे  ए.आय.एम.आय.एम. चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मुहम्मदिया कॉलनीच्या निर्माणापासून आजपर्यंत फक्त माजी आमदार सय्यद सलीम यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही आमदाराने किंवा बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी तसेच या प्रभागात वेळोवेळी निवडून आलेल्या  वेगवेगळ्या नगरसेवकांनी कधीही लक्ष देऊन येथे विकास कार्य केले नसल्याने निर्माणानंतर आजही अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल असलेल्या या मुहम्मदिया कॉलनी परिसरात असलेल्या सय्यद अली नगर, आरेफ अली नगर, बाबा मिया कॉलनी, अहेमदिया चौक, बीड मामला, अरिष चौक पाण्याची टाकी, आमेर कॉलनी मोमीन पुरा, मिल्लत नगर, जी.एन. फंक्शन हॉल, अरफात चौक, मसन वाटा अचानक नगर, दीलावर नगर, तेलगाव नाका चौक, हिदायत नगर, नुर कॉलनी, अख्तर नगर, शहेनशहा वली दर्गा या सर्व परिसराला दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामध्ये नदी नाल्याचे स्वरूप येऊन सगळीकडे चिखल व दलदलीचे तांडव झाले. ज्यामधून रस्ता पार करताना हजारोंच्या संख्येने असलेल्या येथील नागरिकांना तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नाकीनऊ येत होते. येथे चालायला पक्के रस्ते नाहीत. सांडपाणी वाहून न्यायला पक्या नाल्या नाहीत. माजलगाव आणि पाली चे धरण पुरेपूर भरले असतानाही येथील नळांना पंधरा-वीस दिवसानंतर पाणी सोडण्यात येते. या सर्व त्रासाची वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमातून बातम्यांद्वारे तर शासकीय-प्रशासकीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली जाते.

 तरीसुद्धा विद्यमान आमदार, नगराध्यक्ष आणि या प्रभागातील संपूर्ण अर्धा डझन नगरसेवक मनावर घेत नाहीत. किंबहुना या परिसरासाठी हे सर्वजण निकामी असल्याचे वारंवार दिसून आले आहे. यामुळे या सर्व प्रभागातील जनता आता काही वर्षांपूर्वी येथे घेण्यात आलेल्या एका कॉर्नर मिटिंग मध्ये विद्यमान नगराध्यक्षांनी केलेली डायलॉग बाजी चे स्मरण करून म्हणत आहे की, नगराध्यक्षांनी स्वतः सांगितले होते की, सलीम यांनी भलेही सय्यद अली नगर चे रस्ते बनविले असेल परंतु या प्रभागाला मी पुन्हा पहिल्यासारखे (भकास) रूप देईन. त्यांच्या या वाक्याची चर्चा लवकरच येऊ घातलेल्या बीड नगर परिषद च्या आगामी निवडणुका संदर्भात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागली असल्याचे ए.आय.एम.आय.एम. चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No comments