Breaking News

रोजगार हमी योजनेतील मजुरांची खाते राष्ट्रीयकृत बँकेतच अनिवार्य करा


विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सभापती सविताताई मस्के यांची मागणी

बीड :  गेवराई तालुक्यातील बहुतांश गावात रोजगार हमी योजनेत कागदोपत्री कामे उरकून मोठी अफरातफर चालू असल्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावे मल्टीस्टेट निधी बँकेत खाते खोलून त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या बँकेतील खात्यामुळेच योजनेतील भ्रष्टाचार बोकाळला आहे. तरी रोहयोतील संबंधीत मजुरांचे खाते हे राष्ट्रीयकृत बैंकेचेच असावे हा नियम अनिवार्य करावा, जेणेकरून संबंधीत मजुरांना त्यांच्या नावे जमा झालेल्या रकमेचा मेसेज जाईल व या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना लगाम लागेल असे निवेदन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गुरुवारी दिले आहे.

   पुढे निवेदनात म्हटले आहे की, रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची जी खाते आहेत, ते बहुतांश बोगस आहेत. तालुक्यात मजुरांची बोगस खाते हे मल्टीस्टेट निधी बँकेत खोलून कागदोपत्री कामे करुन या बोगस खात्यावर मजुरीची रक्कम जमा करुन ती हडप केली जात असल्याची चर्चा जनतेतुन होत आहे. यामधील बहुतांश मजुरांना आपले खाते हे या बँकेत असल्याची कल्पना देखील नसते. या मल्टीस्टेटची अधिक चौकशी केल्यास रोजगार हमी योजनेतील बोगसगिरी नक्कीच समोर येईल. आपले खाते मल्टीस्टेट मध्ये आहे. 

याची थोडीही भनक नसल्याने त्यांच्या नावे येणारे पैसे रोजगार हमीचे काम करणाऱ्या मोरक्याकड़े संबंधीत अधिकारी सुपूर्त करतात. ते निधी रक्कम बँकेमध्ये जमा होते, संबंधीत बोगस काम करणारे ती लाटतात. कारण मल्टीस्टेटमध्ये मेसेज जात नाही, तसेच मल्टीस्टेट चालकाशी या भ्रष्टाचारी लोकांचे संगणमत असते. या बँकेतील खात्यामुळेच रोहयोतील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचा आरोप सभापती मस्के यांनी केला असून रोजगार हमीमध्ये नावे असणाऱ्या मजूरांची खाते ही राष्ट्रीयकृत बैंकेतच असावे हा नियम अनिवार्य करावा, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताच याची कल्पना या मजुरांना होईल. शिवाय शासनाला लुटणाऱ्या या टोळीला लगाम लागेल असे सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गेवराईतील रोहयोच्या कामांना ब्रेक 

    सभापती मस्के यांनी रोहयोतील भ्रष्टाचार प्रकरणी दि.१५ रोजी सीईओ यांना निवेदन देताच याची गंभीर दखल घेण्यात आली. तालुक्यातील रोहयोच्या कामांना तुर्तास ब्रेक लावून ती पुर्ण कामांची चौकशी होईपर्यंत नवीन मस्टर न काढण्याच्या सुचना त्यांनी गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील सर्वच कामे चौकशी होईपर्यंत बंद राहणार आहे, तसेच नवीन मस्टर तोपर्यंत काढण्यात येणार नाहीत, असे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी सांगितले. यामुळे सध्या पंचायत समितीत रोहयोच्या कामांचीच चर्चा सुरु आहे.  दोषींवर कारवाई याप्रकरणी मी बीडचे मुख्याधिकारी यांना तात्काळ बोलून तशा सुचना देतो. तसेच यामध्ये अशाप्रकारे गैरप्रकार झालेला समोर आल्यास संबंधीतांवर कारवाई करण्याची ग्वाही यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सभापती सविताताई मस्के यांना दिली.

No comments