Breaking News

कचरा टाकण्यावरुन काठ्या कुऱ्हाडीने वीटभट्टी कामगाराला बेदम मारहाण

युसुफवडगाव येथील घटना, सात जणांविरोधात पोलिसात  अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज 

आमच्या शेतात कचरा का टाकला या क्षुल्लक कारणासाठी युसूफ वडगाव येथील वीटभट्टीवर काम करीत असलेल्या लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या मजुरांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे सूरज मुकादम यांच्या वीटभट्टीवर लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जातींचे मजूर त्यांच्या कुटुंबासह राहून मजुरी करीत आहेत. दि. २६ फेब्रुवारी रोजी शिवाजी भालेकर यांच्या पत्नी सोबत वीटभट्टी शेजारी जमीन असलेले शेतकरी सावंत यांच्या पत्नी सोबत कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले.

 त्या नंतर सावंत यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवाजी भालेकर यांची पत्नी, मुलगा, मुलगी सून व शेजारी यांना काठ्या, कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. दि. २७ रोजी त्यांनी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार संगीता सावंत, नितीन सावंत, नवनाथ सावंत व अन्य चार अशा सात जणांविरुद्ध गु. र. न. ३२/२०२१ १४३, १४७, १४९, ३२४, ३२४, ५०४ ५०६ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३ (१) (आर) ३(१) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये हे पुढील तपास करीत आहेत.

No comments