Breaking News

संत - महंतांच्या, महापुरूषांच्या कामाने सकल समाजाचा उद्धार होतो, त्यांना जातीच्या चौकटीत अडकवणे अयोग्य - धनंजय मुंडे

बीड शहरातील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे दिली भेट, प्रतिष्ठानचा विकास प्रस्ताव सादर करा - ना. मुंडे

बीड  : महाराष्ट्र ही संत - महंत आणि महापुरुषांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावता महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ते अगदी अलिकडच्या काळातील संत भगवानबाबा अशा महापुरुषांचे विचार हे समजोद्धाराचे कार्य करतात, त्यांना कोणत्याही जाती-पातींच्या चौकटीत अडकवणे अयोग्य असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

बीड शहरातील जनता दरबार आटोपून ते शहराच्या मध्यवर्ती भागातील संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान येथे भेट द्यायला गेले होते; त्यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वागत समारंभात ना. मुंडे बोलत होते.

अशिक्षित व अप्रगत समाजाला शिक्षणाची गोडी निर्माण करणारे, भूदान सारख्या चळवळीला मराठवाड्यात आणणारे संत भगवानबाबा यांचे जीवनकार्य महान असून त्यांच्या विचारांचा ठेवा आपण जपला पाहिजे असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

प्रतिष्ठानच्या ट्रस्ट कडे काही जमीन शिल्लक असून, प्रतिष्ठानचा विकास व सुशोभीकरण करण्यासंदर्भात चर्चा करताना धनंजय मुंडे यांनी या प्रतिष्ठानचे उदघाटन स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले, त्यावेळी आपण सोबत होतो, प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उदघाटन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्याही वेळी मी सोबत होतो आणि आज प्रतिष्ठानच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर घेतो आहे, हे माझं भाग्यच आहे; असे भावोद्गार ना. मुंडेंनी काढले.

बीड येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी एकत्र चर्चा करून विकासाच्या बाबतीत प्रस्ताव करून द्यावा, त्यानुसार विविध योजनांमधून आपण त्यास निधी उपलब्ध करून देऊ असा शब्दही मुंडेंनी उपस्थितांना दिला. ट्रस्टच्या वतीने ना. मुंडे यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी आ. संदीप क्षीरसागर, बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ. सुनील दादा धांडे,  माजी आ. सय्यद सलीम, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे, भगवान बाबा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. लहाने यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


No comments