केज पोलीसांची धाडसी कार्यवाही : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच आरोपी केजमध्ये पकडला
कोल्हापूर जिल्ह्यातून चोरून आणलेले खताच्या गाडीचा केला फिल्मी स्टाईल पाठलाग
आरोपीसह ट्रक आणि मुद्देमाल घेतला ताब्यात
गौतम बचुटे । केज
केज पोलीसांनी अत्यंत नाट्यमय रितीने एका ट्रकचा पाठलाग करून खत चोरीच्या प्रकरणातील आरोपीच्या मुद्धेमालासह मुसक्या आवळल्या. गुप्तवार्ता विभाग पथक आणि पोलीस पथक यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे चार लाख रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
या बाबतची माहिती अशी की, कोल्हापूर पोलीस ठाण्यात एका ट्रक ड्रायव्हरने परस्पर तो चालवीत असलेल्या ट्रक मधील खताचे पोते दुसऱ्या ट्रक मध्ये भरून खत पळविले असल्याचा गुन्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. त्याची माहिती केज पोलीसांना मिळताच गुप्तवार्ता विभाग आणि केज पोलीसांनी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी ट्रकचा पाठलाग करून तो पकडला. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील अक्षय कृष्णा जाधव हे ट्रान्सपोर्ट व्यवसायात नौकरी करीत आहे. त्यांनी १५ दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील सौ. विजया गोंजारी यांच्या मालकीचा ट्रक क्र. (एमएच-०४/ एफजे ८८७२) हा खरेदी केला आहे. हा ट्रक साईसमर्थ ट्रान्सपोर्टकडे भाडे तत्वावर लावलेला आहे. या ट्रकवर केज तालुक्यातील एकुरका येथील नटराज रामहरी धस हा ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवलेला आहे. दि.१३ फेब्रुवारी शनिवार रोजी नटराज धस याने गुडाळ येथील ४०० पोती इफको कंपनीचे १०:२६:२६ हे १२ टन खत गुडाळ येथे पोहोच करण्यासाठी गाडीत भरले. परंतु त्याने हे खत गुडाळ येथे पोहोच न करता रस्ता चुकल्याचा बहाणा सांगून त्याने सदर ट्रक हा सांगली येथे आणला. तेथून त्याने ट्रक मधील माल दुसऱ्या एका आयशर टेम्पो व टाटा ट्रक क्र. (एमएच-०९/ क्यू-५५३७) मध्ये भरला. नंतर तो ट्रक क्र. (एमएच-०४/एफजे-८८७२) ट्रक तेथेच सोडून पोबारा केला. दरम्यान तो खताचा माल भरलेला ट्रक ईच्छित स्थळी पोहोचला नसल्याची माहिती अक्षय जाधव यास ट्रान्सपोर्ट कार्यालया मार्फत मिळाली आणि ड्रायव्हर नटराज धस याचा मोबाईल फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे ते त्यांचा ट्रक व ड्रायव्हर नटराज धस यांचा शोध घेत सांगली येथे आले. त्यांना ट्रान्सपोर्ट कार्यालया कडून अशी माहिती मिळाली की, त्यांच्या ट्रक मध्ये खत भरून ट्रक रवाना केला परंतु तो ट्रक व त्यातील माल अद्याप पर्यंत इप्सित स्थळी पोहोचला नव्हता. त्यांनी ट्रकचा शोध घेतला असता त्यांचा ट्रक हा सांगली येथे आढळून आला. त्यानंतर त्यांनी तो ट्रक कोल्हापूर येथे आणला ट्रान्सपोर्ट कार्यालयातून मालाच्या बिलटीच्या झेरॉक्स प्रति घेऊन त्यांनी दि.१५ रोजी कोल्हापूर पोलीस स्टेशनला ट्रक ड्रायव्हर नटराज धस याने त्याच्या ताब्यातील ट्रक पळवून नेऊन त्यातील मालाचा अपहार केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस स्टेशनला अक्षय जाधव यांच्या तक्रारी नुसार गु. र. नं. ८९/२०२१ भा. दं. वि. ४२० व ४१८ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सचिन पांढरे हे त्याचा तपास करीत होते. दरम्यान गुन्हा दाखल होताच या बाबत केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना याची माहिती मिळाली की, चोरीचे खताची एक ट्रक परिसरता आढळून आल्यास ताब्यात घेण्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सपोउनि कादरी, जिवन करवंदे, गुप्तवार्ता दिलीप गित्ते, बाळासाहेब अहंकारे, महादेव बहिरवाळ, थोरात, यांना माहिती दिली.
त्या नुसार पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली आणि मस्साजोग जवळ एक संशयित व खताने भरलेली ट्रक असल्याची माहिती मिळताच तिचा पाठलाग करून नाट्यमय रितीने ती मुद्देमालासह ट्रक आज ड्रायव्हर नटराज धस याला ताब्यात घेतले. या कार्यवाहिमुळे केज पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments