Breaking News

आमदार, खासदार फंड कागदोपत्री दाखवणार्‍यांना जेलची हवा खावी लागणार -आ.प्रकाश सोळंके


माजलगाव : शहराच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाणार असून शहरात दर्जेदार कामे होणार आहेत. यापुर्वी काहींनी आमदार आणि खासदार फंडाचा दुरुपयोग करत कागदावर कामे दाखवलेले आहेत. अशांना लवकरच जेलची हवा खावी लागणार असल्याचा इशारा आ. प्रकाश सोळंके यांनी दिला. ते आयोजीत विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आज छत्रपती शाळेमध्ये आ. सोळंके यांचा हस्ते विकास कामांचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर माजी आमदार डी.के. देशमुख, बाबूराव पोटभरे, नगराध्यक्ष शेख मंजूर, शेजुळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या वेळी आ. प्रकाश सोळंके म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शहरात दर्जेदार विकास व्हावा ही आपली अपेक्षा आहे. 5 कोटींचा निधी जो आणला आहे त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत ही सर्व कामे पुर्ण करायची आहेत, असे सांगत सोळंके पुढे म्हणाले की, यापुर्वी शहरामध्ये आमदार आणि खासदारांचा फंड आणण्यात आला होता मात्र या फंडाचा उपयोग कागदोपत्री करून निधी घशात घालण्यात आलेला आहे. ज्यांनी विकास कामामध्ये भ्रष्टाचार केला अशांची गय केली जाणार नाही, त्यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार असल्याचा इशारा सोळंके यांनी दिला. या कार्यक्रमाला अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


No comments