सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे सूत्र बदलून विचारातून सत्ता आणि सत्तेतून विचार हे सूत्र रुजवणार : सौरभ खेडेकर
परळीत रंगतेय नवीन समीकरण संभाजी ब्रिगेड, एआयएमआयएम, वंचित आघाडी, मनसे, शेतकरी संघटना आदी एकत्र येऊन घडवू शकतात चमत्कार
परळी वैजनाथ : २ फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांचा परळी वैजनाथचा दौरा चांगलाच गाजला. जलालपुर भागांत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सौरभ खेडेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शहरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात कोविडचे नियम पाळत जंगी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संभाजीसेवकराम जाधव यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी "शहरांतील समस्या मांडून आगामी काळात संभाजी ब्रिगेडच्या सोशल इंजिनिअरिंगबाबत भाष्य केले. तर त्यानंतर आपल्या मनोगतात तालुकाध्यक्ष देवराव लुगडे (महाराज) यांनी "संभाजी ब्रिगेडचा गेल्या दोन तीन वर्षांतील कार्यअहवाल सादर करत. पक्ष बांधणीसाठी नेतृत्वाने साथ द्यावी" अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुरवसे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी कार्यकर्त्यांत आपल्या भाषणाने नवीन उत्साह भरला. "स्थानिक पातळीवर संभाजी ब्रिगेडने सर्वजणांना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवावेत" असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच, मराठा आरक्षणाबाबत बोलताना खेडेकर म्हणाले की "गेल्या २५ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याशी प्रयत्नरत आहे. मराठा नेत्यांनी इतर नेत्यांना प्रश्न विचारण्याऐवजी मराठा नेत्यांना प्रश्न विचारावे लागतील." ना. धनंजय मुंडे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाबाबत "पक्ष प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक पोस्ट लिहून ना. धनंजय मुंडेंसारखे मेहनतीने उभे राहिलेले संघर्षशील बहुजन नेतृत्व सदाशिव पेठीय पद्धतीने निर्णय घेऊन कोणी संपवू इच्छित असेल तर त्याला आमचा विरोध आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास संयम दाखवणे आवश्यक आहे. मात्र, राजकीय पक्ष म्हणून आमचा अशा गोष्टींना विरोध असेल." अशी भूमिका सौरभ खेडेकर यांनी मांडली.
मराठा सेवा संघाचे दक्षिण भारत प्रभारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एम. एल. देशमुख यांनी "संभाजी ब्रिगेड यापुढे स्थानिक पातळी ते देशपातळीवर प्रस्थापित राजकीय पक्षांना खंबीरपणे पर्याय म्हणून उभा राहील" असा आशावाद व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, प्रवक्ते आणि प्रसिद्ध वक्ते प्रा. बालाजी जाधव यांनी "एका चॉकलेटने मॅनेज होणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना नाही. आमचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत. बेगडी असण्यापेक्षा ब्रिगेडी असणं कधीही चांगलं. खरं बोलण्यापेक्षा बरं बोलणं ही रीत असण्याच्या जगात ब्रिगेड खरंच बोलते. परळीच्या चार दोन गावगुंडांच्या दहशतीला भीक घालू नका, संभाजी ब्रिगेड आपल्यासाठी सदैव उभी असेल. आगामी नगर परिषदेत परळी वैजनाथ पालिकेत संभाजी ब्रिगेड आपला झेंडा नक्की फडकवेल." असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
मराठा आरक्षणाबाबत प्रा. जाधव यावेळी बोलताना म्हणाले की "राज्यातले प्रस्थापित नेते हे जातीचे आहेत पण मतीचे नाहीत. प्रस्थापित नेतेरूपी बुजगावण्यांना नेते मानणे बंद करा, त्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे अशक्य आहे." वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद प्रदेशाध्यक्ष भास्कर निर्मळ यांनी "परळीतील लढाई प्रस्थापितांविरुद्ध असली तरी नाउमेद होऊ नका, आपण सर्वजण मिळून सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करू. यश आपल्याला नक्की मिळेल" अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी केंद्रीय निरीक्षक, अध्यक्ष प्रवीण ठोंबरे,. ईश्वर सोनवणे, संदीप काळे, अंकुश जाधव, संजय देशमुख,नामदेव भालेराव, राजेश ठोंबरे, राजेश पवार, रामराव जाधव, अरुण सपाटे,पवान माने, प्रद्युम्न सोनवणे, राम किर्डांत, परभाकर सटले, गणेश वाळके उपस्थित होते.
सौरभ खेडेकरांचा झंझावात
एक दिवसीय दौऱ्यात सौरभ खेडेकर यांनी संघटना बांधणीसाठी पूर्णवेळ दिला. विविध पक्षसंघटनांनी त्यांचा जागोजागी सत्कार केला. खेडेकरांच्या कार्यकर्ता मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. बऱ्याच वर्षांनी शहरांत पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते सक्रीय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी नवीन समिकरणांची चाहूल लागल्याची चर्चा शहरांत होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच मतदार संघातील करेवाडी येथेही संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उदघाटन उत्साहात पार पडले.
No comments