Breaking News

शेतकऱ्यांना अडवण्यासाठी बॉर्डरवर मोठे खिळे अन बॅरिकेट्सची भिंत उभारल्याने संजय राऊत संतापले

गाझीपुर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. त्यानुसार ते गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. दरम्यान तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सची भिंतच उभारली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.


एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पाठबळ देणं आपलं कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहेत”.

“देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. “राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरुन बोललो होतो. पण फोनवरुन बोलणं आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणं हे महत्वाच आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

दरम्यान तिकरी सीमेवर उभारण्यात आलेले खिळे, भिंती यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसलं नसतं”. अधिवेशनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “अधिवेशनातील लढाई अधिवेशनात, ही रस्त्यावरी लढाई आहे”.

No comments