Breaking News

विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही सारख्या माध्यमांचा वापर करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करावा - श्री सचिन शहागडकर

बीड : स्पर्धा परीक्षेमध्ये खेड्यातील गोर गरीब होतकरू विद्यार्थी यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आपल्या खेड्यातील विद्यार्थ्यांनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईल, टीव्ही, यासारख्या माध्यमांचा वापर करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करावा आवाहन शिवस्वराज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनभाऊ शहागडकर यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप  कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शक करताना केले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चव्हाण सर  हे होते. तर व्यासपीठावर श्री. डोंगरे, श्री वाव्हळ सर, श्रीमती फाटे, श्रीमती साळुंके, श्रीमती सानप, श्री गुजर सर आदी उपस्थित होते. या बाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक अरविंद देशमुख हे मागील आठवड्यात शिदोड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी श्री महालक्ष्मी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. यावेळी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून. गोर गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तराची मदत देऊ असे सांगितले.

त्यानंतर ते मंगळवार दि २ रोजी देवीचा अभिषेक करण्यासाठी व दर्शनासाठी आले असता. त्यांनी शालेय साहित्य खरेदी करून दिले. आज बुधवार दिनांक 3 रोजी त्यांनी दिलेलं साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना शिवस्वराज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनभाऊ शहागडकर पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अरविंद देशमुख यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींची गरज आहे. 

देशमुख यांच्यासारख्या दानशूर व्यक्तीमुळे  समाजातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत असे सांगत त्यांनी शालेय जीवनात महापुरुषांच्या विचाराचे वाचन विद्यार्थ्यांनी करणे काळाची गरज आहे असे सांगितले. गुरुजनांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. गरजुवंत विद्यार्थ्यांना सामाजिक प्रोत्साहनाची नितांत गरज असून आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भवितव्य घडवणार आहेत, विद्यार्थ्यांना सामाजिक प्रोत्साहन व सहकार्य करून त्यांच्यातील गुणांचा गौरव करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे असे सांगत आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आवांतर लक्ष न घालता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. मोबाईल, टीव्ही यासारख्या माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे सध्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये शेकडो खेड्यातील  गरीब होतकरू विद्यार्थी यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर एमपीएससी यूपीएससी परीक्षेचा गड सर करावा. आपल्या शाळेतील  विद्यार्थ्यी भावी आयपीएस आयएएस अधिकारी घडावेत आणि ते घडतील असा विश्वास शहागडकर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम वाव्हळ सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वचिष्ठ शिंदे बाबाराम थोरात  यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनीनी परिश्रम घेतले. शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






No comments