Breaking News

म्हाळसजवळा ते चौसाळा रस्त्याचे काम दर्जेदार करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची पाहणी करून गुत्तेदारांवर कारवाई करावी - गुंदेकर, बजगुडे

बीड : बीड तालुक्यातील म्हाळसजवळा ते चौसाळा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सध्या सुरु आहे. हे काम जरुड पासून पुढे चालू आहे. पुढे काम चालू आणि मागे रस्ता हा डांबर अभावी उखडला जात असून रस्त्याची लेव्हलही राखली जात नाही. याबाबत संबंधित कंत्राटदारांना सांगूनही कामाचा दर्जा राखला जात नसल्याने काल जिल्हाधिकारी व अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची पाहणी करून गुत्तेदारांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर, ग्रामस्थ म्हणून गणेश एस बजगुडे, विलास काकडे, जालिंदर काकडे, लक्ष्मण बजगुडे, सचिन काकडे, परमेश्वर काकडे, महेंद्र निसर्गन्ध आदींनी केली आहे.

   म्हाळसजवळा ते चौसाळा रस्त्याचे काम दर्जाहीन सुरु आहे. या रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. हा मार्ग श्री क्षेत्र चाकरवाडी येथे जोडणारा आहे. या रस्त्यावर म्हाळसजवळा, नाळवंडी, जरुड, भवानवाडी, कुटेवाडी, बोरफडी, येळंबघाट ते चौसाळा पर्यंतच्या गावांची वाहतूक असणार आहे. यामुळे हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. रस्त्यावर खडी, डांबर नियमानुसार टाकायला हवे होते मात्र तसे संबंधित कंत्राटदाराने केलेले नाही, मध्येच चढ - उतार केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही भविष्यात वाढू शकते. या रस्त्याच्या दर्जाची पाहणी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्याकडे करण्यात आलेली आहे.


No comments