Breaking News

कोरोनाचे नियम न पाळणा-यांना वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवा : तहसीलदार राजाभाऊ कदम


व्यापा-यांनी अॕन्टीजन टेस्ट करुन सहकार्य करण्याचे आवाहन 

आष्टी : मास्क न लावणारांना दंडात्मक कारवाई करा त्यांना कोरोनाबाबतचे नियम सांगा जनजागृती करा एवढ्यावर जर जाणूनबुजून कोणी दुर्लक्ष करुन मनाप्रमाणे वागत कोरोनाची नियमावली पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवा असे सांगत व्यापा-यांनी दोन दिवसांत कोरोनाची अॕन्टीजन टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याचे मत तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी व्यक्त केले.


 आष्टी तहसील कार्यालयात गुरुवारी प्रशासन व व्यापारी यांची कोरोनाबाबत एक आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत तहसीलदार राजाभाऊ कदम बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,पोनि. सलीम चाऊस, सपोनि भारत मोरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत शेळके, उपाध्यक्ष शहादुल्ला बेग, वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन मोरे, डॉ. राहूल टेकाडे, डॉ. विलासराव सोनवणे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रभाकर अनंञे, नगरपंचायतचे लेखापाल हरकळ, डॉ. नदीम शेख, डॉ. प्रकाश झांजे, डाॕ. महेंद्र पटवा, तलाठी शिंदे, सिंगनवाड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना तहसीलदार कदम म्हणाले की, आष्टी शहरात शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी व शनिवार दि.२७ फेब्रुवारी या दोन दिवसामध्ये अॕन्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या अनुषंगाने शहरातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्याकडील असलेल्या कामगारांनी ॲन्टीजन टेस्ट करणे बंधनकारक आहे.तसेच आरोग्य विभागासह नगरपंचायत प्रशासनाने कोरोनाबाबत जनजागृती करणे आवश्यक असून सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज असल्याचेही कदम म्हणाले.शहरातील वैद्यकीय सेवा देणा-या डाॕक्टरांनी रुग्णांमध्ये संशयास्पद काही आढळल्यास त्याला तात्काळ कोरोना टेस्ट करण्यास सांगणे जेणेकरुन कोरोनाला आळा घालण्यासाठी हि एक महत्वाची अंमलबजावणी आपल्या माध्यमातून होणे गरजेचे आहे.

तसेच मेडीकल स्टोअर्स वाल्यांनी सर्दी,खोकला,ताप आल्यानंतर रुग्णाला प्रथम डाॕक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार मिळतील अशा आशयाचा सुचना फलकच आपल्या स्टोअर्स समोर लावला तर ते देखील योग्य असेल.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होणे आणि ते कृतीतून आमलात आणने बंधनकारक असेल यामध्ये कोणीही हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असृही कदम म्हणाले.व्यापारी व नागरिकांनी तहसिल प्रशासन, आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी  मदत करण्याचे आवाहनही शेवटी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

आष्टी शहरात शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी व शनिवार दि.२७ फेब्रुवारी रोजी कन्या प्रशाला शाळा खडकत रोड आष्टी व जिल्हा परिषद शाळा मुलांची आष्टी (पोलीस स्टेशन शेजारी) येथे ॲन्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. याचा व्यापारी व कामगारांनी लाभ घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

No comments