Breaking News

गेवराई तालुक्यात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार : सभापती सविता बाळासाहेब मस्के यांची तक्रार ; चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा आंदोलन


गेवराई : गेवराई तालुक्यातील गावोगावी झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अनेक गावांत कामे न करताच संबंधीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे दाखवून मलिदा लाटण्यात आलेला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी या योजनेवर खर्च झालेला असताना कामे दिसून येत नाही, हे वास्तव तालुक्यात दिसून येते. तरी या कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

     शासनाकडून रोजगार हमी योजना हि मजूरांच्या हाताला रोजगार मिळावा या उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेली योजना आहे. मात्र या योजनेचा लाभ हा केवळ कागदावरील मजुरांना होताना दिसत आहे. या योजनेतून राबविण्यात येणारे वृक्षलागवड, शोषखड्डा कामे, बांध-बंदिस्त, चर खोदाई आदी कामे गेवराई तालुक्यातील गावोगावी करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी या कामावर खर्च करण्यात देखील आला आहे. मात्र गावोगावी पाहणी केल्यास बहुतांश गावात या योजनेतून झालेली कामे निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे सदरील कामे हे केवळ कागदोपत्री दाखवून बोगस बीले हडप करण्यात आली आहेत. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा गावागावांत सर्वसामान्य लोकांमध्ये होत आहे. गेवराई तालुक्यात हि योजना फक्त शासनाला लुटण्यासाठी राबविण्यात येत आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

      दरम्यान या योजनेअंतर्गत तालुक्यात कागदोपत्री कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावे लाखोंची रक्कम लाटल्याचा प्रकार देखील यापूर्वीच समोर आलेला आहे. अशाप्रकारे रोजगार हमी योजनेबाबत जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या तक्रारी असताना देखील गांभीर्याने घेतले जात नसल्यानेच या योजनेतील भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढत चालला असून शासनाला लुटण्याचा गोरख धंदा म्हणून या योजनेची नवी ओळख तालुक्यात होत असल्याची चर्चा असून पंचायत समितीत खैरात वाटल्यागत कामांना मंजुरी दिली जात आहे. ती कामे होतात की नाही हे पाहितले जात नसून अधिकारी हे ठरलेली टक्केवारी घेऊन बोगस कामांना बळ देत आहेत. तरी तालुक्यात आतापर्यंत झालेल्या कामांची सखोल चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियानासाठी गावोगावी जाण्यात आले. यावेळी या कामांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.  या योजनेत मोठा भ्रष्टाचार झालेला असून रोजगार हमीचे काम कमी, अर्ध्यात तुम्ही, अर्ध्यात आम्ही अशीच काहीशी गत या शासनाच्या योजनेची होत असून सर्रासपणे खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे या योजनेच्या बोगस कामांची चौकशी तात्काळ व्हावी. तसेच यापुढे मंजूर केलेली कामे प्रत्यक्षात होतात का ? याकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

     

No comments