Breaking News

सन 2018 बीड जिल्ह्यातील सुमारे 23 हजार शेतकरी सोयाबीन पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित

कृषी आयुक्त धीरजकुमार यांची कबुली

बीड :  सन 2018 सालातील सोयाबीन पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सुमारे 23 हजार शेतकऱ्यांना ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनीने अजून दिली नाही.अशी कबुली राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून उर्वरित रक्कम मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

        शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, बीड जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, बंडूआप्पा देवकर,विजय आटोळे,कृष्णा जगताप, राधाकिशन गडदे यांच्या समवेत 9 फेब्रुवारी 2021रोजी कृषी आयुक्तालय, पुणे येथे बीड जिल्ह्यातील सन 2018 च्या सोयाबीन पीक विमा नुकसान भरपाई बाबत बैठक झाली. त्यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी ही वस्तुस्थिती स्पष्ट करुन कारवाईचे आश्वासन दिले.

      आष्टी तालुक्यातील धानोरा महसूल मंडळातील सन 2019 चा हवामान आधारित डाळींब फळ पीक विमा नुकसान भरपाई बाबत लवकरच निर्णय करण्यात येईल.अती पावसामुळे सन 2020 खरिपात 72 तासात नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन न केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान दिलेले आहे.तेच निकष गृहीत धरून विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी सोबत बैठक करून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून देवू असे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळपीकासाठी ठाकरे सरकारने हेक्टरी 18 हजार रुपये अनुदान दिले.मात्र आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्यांना केवळ 9 हजार रुपये अनुदान वाटप केले. याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिले. 

No comments