Breaking News

श्री.क्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या 133 कोटी रूपयांच्या आराखड्याच्या चित्रफितीचे सादरीकरण


परळी : परळी वैजनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या 133.58 कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने मंजुरी दिली असून, या द्वारे ज्योतिर्लिंग परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. याबाबत तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या डिजिटल चित्रफितीचे न.प.अध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले. 

या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन बारीमधील प्रतिक्षागृह, धर्मशाळा, सुलभ शौचालय संख्या वाढवणे, मेरूपर्वतावर कॉटेज, उपहारगृह, उद्यान निर्माण करणे, दगडी फरशी बसवणे, सरंक्षण भिंत, वाहनतळ, हरिहर तीर्थाचा विकास, पेव्हर ब्लॉकिंग, आर.ओ. मशिन सह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाढवणे, डोंगरतुकाई परिसरात सभामंडप, धर्मशाळा, उद्यान, वाहनतळ, सिमेंट रस्ता, भुयारी मार्ग तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलीसांकरिता टेहळणी मनोरे, माहिती फलक, प्रतिक्षालय फर्निचर, पालखी मार्गाचा विकास, मंदिर परिसरात भव्य नंदी, त्रिशुल व डमरू, या सह डिजिटल लॉकर पासून ते सोलार लाईट उभारणी पर्यंत अशी विविध 77 प्रकारची विकास व सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

या 133.58 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या डिजिटल चित्रफितीचे आज सादरीकरण करण्यात आले. या वेळी न.प.अध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, न.प.गटनेते श्री.वाल्मिकअण्णा कराड, उपनगराध्यक्ष श्री.शकील कुरेशी, वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे सचिव श्री.राजेश देशमुख व सर्व विश्वस्त, श्री.बाजीराव भैय्या धर्माधिकारी, न.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, नगर परिषदेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन न.प. शिक्षण सभापती गोपाळकृष्ण आंधळे यांनी केले.


No comments