Breaking News

संतापजनक : केजमध्ये चालविला जातोय चक्क छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या नावाने मटका !


महापुरुषांच्या नावाने मटका घेणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

चार दिवसात सर्व अवैद्य धंदे बंद करण्याचे प्रशासनाला संभाजी ब्रिगेडचा अल्टीमेटम !

गौतम बचुटे । केज  

तालुक्यात अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना घडली असून एका अवैद्य मटका चालकाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मटका सुरू केला असल्याची खळबळजनक व चीड उत्पन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या बाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी केली आहे.

केज शहरात अवैद्य धंदे बोकाळले असून त्यांच्यावर स्थानिक पोलीस किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा धाक राहिलेला नाही. लोकांना आकर्षित करण्यासाठी एका मटका व्यावसायिकाने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाचा दुरुपयोग केला आहे. अशा या सडक्या मेंदूच्या एका मटका व्यावसाईकाने चक्क चेन्नई शिवप्रेमी मटका असे चिट्टीवर छापून त्यावर मटका घेतला आहे. या प्रकरणी माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, केज शहरात अवैध धंदयाच्या सुळसुळाट माजला आहे. अवैद्य धंदयावाल्यांना प्रशासनाकडुन अभय दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता असणारे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजरोस मटका घेणे सुरू आहे. याकडे प्रशासनाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येत आहे. एकंदर मटका, दारू, जुगार आणि अवैध धंदे केज शहरात राजरोस चालु आहेत. 

तरी देखील प्रशासन कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही. केज शहरातील या चेन्नई शिवप्रेमी नावाने मटका घेणाऱ्या व्यक्तीस पकडुन त्याचा मटका धंदा पुर्णपणे बंद करावा. शहरातील अवैध धंदे बंद करुन कडक कार्यवाही करावी. तालुक्यातील व शहरातील तरूणवर्ग, विद्यार्थी हे अवैध धंदे चालु असल्याने व्यसनाधिन होत आहेत. जर हे अवैद्य धंदे बंद झाले नाहीत तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे अवैद्य धंदे संभाजी ब्रिगेड बंद करील आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहिल. असा ईशारा दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर राहुल खोडसे, श्रीकृष्ण घाडगे, अजित चाटे, राजेश तपसे, तेजस नायकोडे, संदीप शितोळे, संजय लोंढे, शेखर थोरात, सुजित गुजर, शुभम चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments