Breaking News

शोषित-पीडितांचा आवाज मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वर्तमानपत्रांचे स्थान समाजामध्ये अतिशय महत्वाचे असते. वर्तमानपत्रांमध्ये समाजात घडणार्‍या वेगवेगळ्या घटनांचे प्रतिबिंब उमटत असते. समाजप्रबोधनासाठी आणि काळाच्या नवनव्या बदलांची विचारसरणींची दखल घेणारे माध्यम  म्हणून वर्तमानपत्राकडे पाहिले जातं. म्हणूनच वर्तमानपत्रांना समाजाचा आरसा म्हणतात. स्वातंत्र्यपुर्व काळात भारतीय  भाषामध्ये सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, टिळकांचे केसरी, आगरकरांचे सुधारक अशा वर्तमानपत्रांनी महत्वाची भुमीका निभावली.

परंतु यातील बहुसंख्य वर्तमानपत्र ही अभिजन वर्गाची होती. भारतातील पहिले बहुजन वर्तमानपत्र महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून प्रेरणा घेवून 'दिनबंधू’ हे कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 साली सुरू केले. तर अस्पृश्यांचे पहिले पत्रकार म्हणुन गोपाळबाबा वलंगकर यांना मानल जातं.त्यांनी दिनबंधू ,दिनमित्र, सुधारक या वर्तमानपत्रामध्ये लेखन केलेले आहे. शिवराम जानबा कांबळे यांनी 'सोमवंशी मित्र 'हे पहिले दलित साप्ताहिक सुरू केले. किसन फागु बंदसोडे यांनी निराश्रीत हिंद नागरीक, विटाळ-विध्वंसक, मजुर पत्रीका ही तीन वृत्तपत्रे सुरू करून जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारीतेला 1920 मध्ये प्रारंभ झाला. भारतातील अस्पृश्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी व्यापक चळवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केली होती. अस्पृश्य, अदिवाशी, शेतकरी, कष्टकरी, बहुजनांचे प्रश्न, जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी साधन असावे असे त्यांना वाटले. म्हणून ते म्हणतात ,"कोणत्याही चळवळीला यशस्वी करण्यासाठी वृतमान पत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसते तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते." म्हणून समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी 'मूकनायक'  या पाक्षिकाचा जन्म झाला. त्याची बिरूदावली म्हणून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्या

काय करू आता धरुनिया भिड। नि:शंक हे तोंड वाजविले॥

नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हीत॥

 या छापल्या जात. मूकनायकच्या पहिल्या अंकात मनोगत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. "जर या भारत देशाच्या सृष्ट  पदार्थांच्या व मानव जातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश म्हणजे केवळ  विषमतेचे माहेरघर आहे. पुढे ते म्हणतात आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाय-योजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नतीचे मार्ग सुचविण्यास वर्तमानपत्रासारखी दुसरी भुमीच नाही. परंतु मुंबई इलाक्यातील वर्तमानपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरेचशी पत्रे ही विशिष्ट जातीची हितसंबंध जोपासणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते." तत्कालीन वर्तमानत्रे अस्पृश बहुजन समाजाचे प्रश्न यांच्या समस्या यांच्याकडे दुर्लक्ष करीत होती. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक हा मानवमुक्तीचा अंगार ठरतो. 

  एकीकडे राजर्षी शाहु महाराज मूकनायकसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करतात. तर दुसरीकडे लोकमान्य टिळक मूकनायकची जाहिरात त्यांच्या 'केसरी' वर्तमानपत्रात छापण्यास नकार देतात. हे विशेष. बहिष्कृतभारतच्या चौथ्या अंकात 20मे 1927 ला अग्रलेखात बाबासाहेब स्वत: लिहतात. "आम्हाला पक्के आठवते 1919 साली आम्ही मूकनायक पत्र सुरू केले तेव्हां केसरीला आमची जाहिरात छापा,अशी विनंती केली पण ती धुडकावून लावली. तदनंतर तुमचा आकार देतो छापा अशी विनंती केली. तरीही जागा रिकामी नाही असे उत्तर देण्यात आले. इतकेच नव्हे तर अभिप्रायही दिला नाही. केसरीच्या अभिप्रायास आम्ही तीन दमड्यांचीही किंमत देत नाही."

 यावरून असे दिसून येते की, राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाश-पाताळ एक करणारे नेते सामाजिक विषमतेवर जातीभेद अस्पृश्यतेवर एक शब्द ही बोलत नव्हते. म्हणून मूकनायकची उपयुक्तता लक्षात येते. बाबासाहेबांचा मूकनायक सर्वांगाने अर्थपुर्ण होता. त्यांची पत्रकारीता सामाजिक बांधिलकेच्या तत्वज्ञानातून आली होती. 1920 ला पुढील शिक्षणाकरीता बाबासाहेब इंग्लडला गेले. तो पर्यंत मूकनायकचे 12 अंक प्रकाशीत झाले होते. 31 जुलै 1920 तेराव्या अंकापासून या वृतपत्राचा कारभार ज्ञानदेव घोलप यांच्याकडे सोपवल्याचे दिसून येते. मूकनायक वृत्तपत्र एप्रिल 1923 मध्ये बंद पडले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत (1927) जनता (1930) आणि प्रबुध्द भारत (1956) अशा वृतमानपत्रांची निर्मीती केली. 

बहिष्कृत भारतावर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरीतील ओव्या

आता कोदंड घेवूनी हाती। आरूढ पाइये रथी॥

देई अलिंगन विरवृत्ती समाधाने। जगी किर्ती रूढवी। स्व धर्माचा मानू वाढवी॥

इया भारापासोनी सोडवी। मेदीनी हे॥

आता पार्थ नि:शंकु होई संग्रामाचा चित्त देई। 

एक वाचुनी कांही बोेलो नये॥

म्हणजे तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात संग्राम आणि केवळ संग्रामाशिवाय कांहीही नाही अशी युध्द प्रेरणा अस्पृश्य बहुजनामध्ये बाबासाहेब चेतवीत होते.  तर जनता वृत्तपत्राची बिरूदावली होती. 'गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल.'या वृत्तपत्रातून सर्व निकडीचे प्रश्न चर्चीले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रेही जनतामधून प्रसिध्द झाली. 1955 पर्यंत जनता सुरू होते. 4 फेब्रुवारी 1956 ला जनता चे नामकरण प्रबुध्द भारत असे करण्यात आले.

अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांची आंदोलने त्यांची मानवमुक्तीची चळवळ जगासमोर पोहचविण्याचे काम त्यांच्या वर्तमानपत्रांनी केले. देशातील बिनीच्या पत्रकारांच्या तोडीची त्यांची पत्रकारीता असूनही मराठी वृत्तपत्रसृष्टीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आज इलेक्टॉनिक मिडीयाच्या जमान्यात लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कोलमडताना दिसत आहे. आजच्या पत्रकारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या  लोकपत्रकारीतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांना , शोषीत-पीडितांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा हीच मूकनायक शताब्दी समारोप प्रसंगी अपेक्षा.

लक्ष्मण वैराळ(परळी वै.)

मो. नं. - 9423774164No comments