Breaking News

कांद्याचे दर्जेदार पीक व उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा : आमदार सुरेश धस

आष्टी : कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा झालेला नावलौकिक हा एका दिवसात झालेला चमत्कार नाही. त्यासाठी खूप मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. सुरुवातीच्या काळात पोतड्याच्या हॉटेलमध्ये दररोज मी येऊन बसत होतो. अनेक व्यापाऱ्यांना येथे येण्यासाठी प्रोत्साहित करत होतो या ठिकाणी चार-दोन दुकाने सोडता कोणीही व्यापार करीत नव्हते , त्यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची धान्य विक्री साठी अडचण होत होती त्याचवेळी तालुक्यात कांद्याचे उत्पन्न वाढू लागल्याने जवळपास कांद्याची आडत कुठेच नव्हती यामुळे शेतकरी वर्गासाठी कांद्याची आडत सुरू करणे गरजेचे होते यासाठी मी अनेक व्यापाऱ्यांना प्रोत्साहित केले त्यास शेतकरी व व्यापाऱ्यांनी साथ दिल्याने येथील बाजार समितीचे आज वैभव दिसत आहे. राज्यात लासलगाव नंतर कड्याच्या कांदा बाजारपेठेचे राज्यभर नाव घेतले जाते या ठिकाणावरून परदेशातील अनेक देशात कांदा निर्यात होत असून यापुढे शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा उत्पन्न वाढीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले.


कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबीर घेण्यात आले. त्याप्रसंगी आमदार धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण तथा तज्ञ कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब पिसोरे, तहसीलदार शारदा दळवी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर ,पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, विक्रमी कांदा उत्पादक शेतकरी जिजा बापू करडुळे, सरपंच अनिल ढोबळे, बाजार समितीचे सभापती दत्तात्रय जेवे, उपसभापती शिवाजी अनारसे ,रमजान तांबोळी,सचिव हनुमंत गळगटे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना म्हणाले की, आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कांद्याचे उत्पादन वाढत चालले आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी अत्यंत तळमळीने शेती करून कांदा उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. यांना कांद्याचे डॉक्टर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

तालुक्यामध्ये एकरी 14 टनांपर्यंत कांदा उत्पादित केला जातो ही अभिमानाची व भूषणाची  गोष्ट आहे. तालुक्यातील धिर्डी येथील शेतकरी जिजाबापु करडुळे यांनी सात एकर मध्ये 25 लाख रुपयांचा कांदा उत्पादित केला हा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाबासाहेब पिसोरे यांनी शंभर वर्षे जगावे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत राहावे अशी इच्छा व्यक्त केली.


बाजार समितीमध्ये कोणतेही शेतकऱ्यांची तक्रार येऊ  न देण्यासाठी मी व सर्व बाजार समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील असून यापुढील काळात बाजार समिती मध्ये आणखी सुविधा देण्यात येतील. येथील रस्ते व इतर भौतिक सुविधा लवकरच देण्यात येणार आहेत त्यामुळे बाजार समितीची बाहेर विनाकारण कोणी बदनामी करू नये चुकीचा अपप्रचार करून नाव खराब न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आष्टी तालुक्यातून बाहेर जाणारा कांदा तालुक्यातच कसा रोखला जाईल यासाठी ही भविष्यात प्रयत्न केले जातील. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पारदर्शक व्यवहार होत आहेत .आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा एक रुपयाचीही लबाडी या बाजार समितीच्या आवारात झालेली नाही. ही भूषणाची गोष्ट असून यापुढेही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे काम करेल अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली.

कृषिभूषण तथा  तज्ञ कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब पिसोरे म्हणाले की, मी वीस वर्षापासून कांदा उत्पादन वाढीसाठी झगडत असून राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना कांद्या विषयी मार्गदर्शन केले आहे यासाठी शासनाने मला दोन वेळा परदेशात पाठवले आहे 12 ते 13 देशांमध्ये कांदा उत्पादन होते याठिकाणी जाऊन मी स्वतः अनुभव घेतले आहेत तालुक्यात दर्जेदार कांदा पिकवण्यासाठी अनेक शेतकरी मेळावे ,शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले आहे. ग्रामीण भागातून बाहेर देशात कांदा निर्यात होतो ही अभिमानाची गोष्ट आहे कडा बाजार समितीने अहमदनगर येथील बाजार समितीला देखील मागे टाकले आहे शेतकरी वर्गांनी कांदा उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे अगोदर तयार करणे गरजेचे आहे.  

दर्जेदार बियाणे असेल तर कांदा पीक दर्जेदार येणारच नाही त्यासाठी दर्जेदार कांदा बियाणे स्वतः शेतातच तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतामध्ये पंधरा लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होते तर पंधरा लाख टन बियाणे लागते तसेच महाराष्ट्रात तीन लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होत असून राज्यात तीन हजार हेकटर कांद्याचे बियाणे लागते यासाठी बियाणे मध्ये फसवणूक होऊ न देता शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून स्वतः स्वतःचे बियाणे तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.


कांदा उत्पादनातून शेतकरी करोडपती होत आहेत त्यासाठी आधुनिक पद्धतीने कांदा उत्पादन करण्याची गरज आहे आज ऊसाला कांदा भारी पडत असून चार महिन्यात मलामाल करणारे हे पीक आहे.देशात दररोज पंधरा लाख टन कांदा खाण्यासाठी वापरला जातो यापुढेही कांद्याला चांगला बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खराब कांदे बियाणे उत्‍पादनासाठी वापरू नका. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे जर बी दर्जेदार असेल तर पीक नक्कीच  दर्जेदार व उत्पन्न वाढीसाठी लाभदायक ठरू शकते. जोपर्यंतदर्जेदार बियाणे तयार होत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही तसेच कांदा लागवड करताना कोरड्या वाफ्यात  कांद्याची लागवड करावी ओल्या वाफ्यात करू नये तसेच अगोदर कांद्यासाठी खत पेरावे शिवाय कांदा लागवड करताना पेरणी यंत्राचा वापर करावा जेणेकरून कांदा लागवडीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना नफा वाढीस मदत होईल. अतिपावसाने जमिनीमध्ये बुरशी तयार झाली आहे  त्यासाठी अगोदर जमीन बुरशी मुक्त करून नंतरच कांदा लागवड करण्याचे आवाहन पिसोरे यांनी केले. यावेळी त्यांनी परदेशातील कांदा शेती व भारतातील कांदा शेती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत एकरी उत्पन्न कसे वाढेल यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न कसा करावा हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.

 आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले की, शेतकरीवर्गाने आधुनिक शेतीची कास धरून प्रगती करावी.कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी असून त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवकांशी सातत्याने संपर्कात राहण्याची गरज आहे. यावेळी तहसीलदार शारदा दळवी यांनी ई पीक पाहणी अँपचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करून स्वतःच्या शेतात स्वतः या ॲप मध्ये माहिती अपलोड करावी जेणेकरून विमा ,अनुदान यासारख्या शासकीय योजनांमध्ये याचा फायदा होईल. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ, कांदा व्यापारी बबलू तांबोळी, राजू खलाटे, समद शेख, निसार शेख ,दादासाहेब थोरवे, लक्ष्मण ननवरे, लक्ष्मण बांदल, शेतकरी गौतम आजबे, अशोक झिंजूरके, बाळासाहेब कर्डीले, राम मधुरकर, नागेश कर्डीले, संपत कर्डीले,हिराशेठ बलदोटा, संजय मेहेर यांच्यासह  आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बीड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची काल बदली करण्यात आली आहे चांगल्या माणसाचा राजकीय लोकांनी बळी घेतला असून सत्ताधाऱ्यांनी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करून काय साध्य केले असा सवाल आमदार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आष्टी तालुक्यातील धिरडी येथील शेतकरी  जिजा बापू करडुळे या शेतकऱ्यानी सात एकर मध्ये 25 लाख रुपयांचे कांदा उत्पादन घेतले त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील वीस लाख रुपये व 10 लाख रुपये कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


No comments