Breaking News

अवैध दारू विक्रीवर केज पोलिसांचा छापा : मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

केज । गौतम बचुटे 

केज येथे चोरट्या मार्गाने अवैद्यरित्या देशी व विदेशी दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल हस्तगत करून आरोपी ताब्यात घेतला.


या बाबतची माहिती अशी की, केज येथे दिनांक २४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे त्यांचे सहकारी बाळासाहेब अहंकारे व दिलीप गिते हे सायंकाळी ६:३० वा.च्या दरम्यान केज शहरात गस्त घालीत असताना त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, केज -अंबाजोगाई रोड वरील  सोनिजवळा फाट्यावरील चौधरी टिंबर्सच्या जवळ अनिल सिताराम सत्वधर हा इसम बेकायदेशीररित्या चोरट्या मार्गाने देशी व विदेशी दारू विक्री करीत आहे.


 ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, बाळासाहेब काळे आणि दिलीप गिते यांनी छापा मारला असता त्यांना अनिल सत्वधर हा इसम टँगोपंच व मॅक्डॉल कंपनीच्या देशी व विदेशी दारू विक्री करत असताना आढळून आला. पोलीसांनी छापा मारून त्याच्या ताब्यातील मॅक्डॉल आणि टॅंगोपंच या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या भरलेले बॉक्स व अनिल सत्वधर यास ताब्यात घेतले. त्याच्या विरूद्ध केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीसांनी अवैध धंद्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे अवैद्य धंदे चालक धास्तावले असून त्यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


No comments