Breaking News

पत्रकारितेतील 'बहुआयामी व्यक्तिमत्त्व': संतोष मुळी

पत्रकार म्हणजे एक असा व्यक्ती, ज्याला स्वतःचा आणि समाजाचा अनुभव यांची सांगड घालून निस्वार्थ भावनेने समाजासमोर चांगले- वाईट अनुभव लेखणीच्या माध्यमातून मांडून सामाजिक अभिसरणातील शिलेदाराची भूमिका वठवता यायला हवी आणि हीच भूमिका माजलगाव सारख्या ग्रामीण भागात मागील २७ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यातून करण्याचं काम ज्येष्ठ पत्रकार संतोष मुळी हे करत आहेत.

     पत्रकारिता हा व्यवसाय न समजता समाजाप्रती घेतलेले व्रत समजून संतोष मुळी सरांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आशा सर्वव्यापी क्षेत्रातील प्रश्न ,समस्यांना प्रभावीपणे मांडण्याचं कार्य केले आहे. शिक्षकी पेशा हा चरितार्थाचं प्रमुख साधन असल्याने त्याला पाहिलं प्राधान्य देत सुरुवातीच्या काळात दै. चंपावतीपत्र, दै.झुंजार नेता यांसारख्या वृत्तपत्रातून त्यांनी वृत्तांकनाचा श्रीगणेशा केला.त्यानंतर १९९३ साली दै. सकाळचे तालुका प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने पत्रकारितेला सुरुवात केली.इ.स.२००० साली दै. सकाळची स्वतंत्र औरंगाबाद आवृत्ती सुरू झाल्या नंतरही हा प्रवास कायम राहिला जो आजही सुरूच आहे.  प्रारंभीच्या काळात आज इतकी संपर्काची साधने सुद्धा उपलब्ध नसताना टपाल आणि दूरध्वनीच्या माध्यमातून योग्य वेळेत बातमी पोहोचवण्याची कसरत केल्याचे अनेकदा त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून ऐकले आहे.सध्याच्या  इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या काळातील पत्रकारांसाठी हे त्यांचे हे अनुभव म्हणजे मोठी शिदोरीच आहे.

      

प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपली बातमी पहिल्या पानावरती आपल्या नावासहित लागण्याचं मुळी सरांचं ते स्वप्न खूप कमी काळात साकारलं ते शिक्षणमहर्षी वैजनाथराव शिंदे यांच्या लवुळ येथील 'निशुक्ल विद्यार्थी वसतिगृहाच्या' बातमीने आणि तेही दै. सकाळच्या पुणे आवृत्तीच पाहिलं पान. येथून सुरू झालेल्या प्रवासात मग मुळी सरांनी मागे वळून बघितलंच नाही.प्रारंभीच्या काळात सकाळचे तत्कालीन संपादक यामाजी मालकर, महाजन सर ,अशोकराव देशमुख बीड,यांचे मार्गदर्शन तर स्थानिक पातळीवर संपादक सुहास देशमुख, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांचे सहकार्य लाभले.  ग्रामीण भागातील पत्रकारितेला मर्यादा असतात हा समज आपल्या अभ्यासपूर्ण बातम्यांच्या माध्यमातून मुळी सरांनी दूर करण्याचा काम केलं. भारतातील पहिल्या माजलगाव धरणावरील फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बातमीला सकाळ समूहाचा रोख पाच हजार रुपयांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.त्याच प्रमाणे माजलगाव सारख्या मागास तालुक्यातील अनेक प्रश्न आणि घटकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. ज्यात शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्नही त्यांनी लावून धरला तसेच या भागातील शेतकऱ्यांचे,कामगारांचे प्रश्न,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा दर्जा,कारखान्यां संबंधीच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी,सिंचनाचे प्रश्न मांडण्याचा तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर वेळप्रसंगी लेखणीद्वारे अंकुश ठेवत चांगल्या कामाची प्रशंसाही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या 'पीकपाणी' सदरातील अभ्यासपूर्ण वृत्तांकनाला तर अनेकदा सर्व स्तरातून गौरविण्यात आले आहे.अगदी शेतकऱ्याच्या भूमिकेत जाऊन केलेलं त्यांचं वार्तांकन अभ्यासकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस अनेकदा उतरलं. एक शिक्षकी पेशा असलेला व्यक्ती जेव्हा पत्रकार म्हणून समाजाचे प्रश्न- समस्यांकडे बघतो त्यामध्ये असणारी संवेदनशीलता मुळी सरांच्या लेखणीतून व्यक्त झाल्याचे अनेकदा दिसूनही आले नव्हे तर त्यांनी ती संवेदनशीलता प्रकर्षांने जपली आहे असं म्हणणं योग्य ठरेल.पत्रकार आणि राजकारणी यांचे संबंध सर्वश्रुत असतानाही त्या संबंधांना वेगळा आयाम देण्याचं काम मुळी सरांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून माजलगावत केलं.

 दै. सकाळचे वार्ताहर आणि महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतानाही त्यांनी दोन्हींमध्ये योग्य समन्वय साधण्याचं दिव्यही अगदी सहजरित्या पार पाडल. नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला,आ.भा. साने गुरुजी कथामाला, मराठवाडा जनता विकास परिषद, सर्वोदय समिती,श्री दत्त मंदिर समिती,सन्मित्र गृहनिर्माण संस्था,पत्रकार संघ इ.विविध संस्था- संघटनांच्या माध्यमातूनही  सुरूच असणार त्यांचं कार्य  त्यांच्यातील बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख देत असतं.

    विविध चळवळींच्या माध्यमातून अग्रणी असणारे,विद्यार्थीप्रिय शिक्षक-मुख्याध्यापक, दृष्टे आयोजक आणि लोकसंग्रहाक,अभ्यासक,चोखंदळ रसिक आणि ज्येष्ठ पत्रकार संतोष मुळी सरांना माजलगाव पत्रकार संघाकडून यंदाच्या 'दर्पण पुरस्काराने ' गौरविल जात असून यामुळे नक्कीच पुरस्काराचीही शोभा वाढेल असं म्हणणं वावग ठरणार नाही.हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी कार्याचा यथोचित सन्मानच आहे.No comments