Breaking News

घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दोघांसह एका अल्पवयीन चोरट्याला ठोकल्या बेड्या ; १५ मोबाईलसह ४ दुचाकी केल्या जप्त

बीड : अल्पवयीन मुलाला हाताशी धरून त्याच्या मार्फत दुचाकीसह मोबाईल चोरणार्‍या आणि घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या अवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. काल एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १५ मोबाईल, चार दुचाकींसह नगदी रक्कम जप्त केली आहे.

जुबेर ऊर्फ पापा मुश्ताक फारोकी (रा. रोजा मोहल्ला केज) व अन्य एक अल्पवयीन आरोपी यांनी केज शहरातील नेहरू नगर येथील एक घर ३०-११-२०२० रोजी फोडले होते. तेथून ३ मोबाईल व नगदी १५ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावत त्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि दोन हजार रुपये जप्त केले तर त्यांच्याकडे इतर १३ मोबाईल आणि चार दुचाकी मिळून आल्या. त्या त्यांनी केज शहरातून चोरल्या असून या प्रकरणी केज पोलिसात ४८९/२०२० , ५५७/२० व २६/२०२१ नुसार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमालासह पुढील तपासासाठी केज पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दुल्लत, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, यूनुस बागवान, सखाराम पवार, सायबर सेलचे विक्की सुरवसे, कलीम शेख यांच्यासह घुंगरट, अतुल हराळे यांनी केली.


No comments